vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत एकरकमी तडजोडीची संधीआधार प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा होणार

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत एकरकमी तडजोडीची संधीआधार प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा होणार

सातारा प्रतिनिधी : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ लागू केली असून, लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) योजना लागू करण्यात आली आहे. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

 

 

या योजनेत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जांचा तसेच पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित पीक कर्जांचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न भरलेली रक्कम कर्जमाफीसाठी विचारात घेतली जाणार आहे.

दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी :पात्र शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्जाची संपूर्ण माफी करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी दोन लाखांवरील रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत बँकेत जमा केल्यास त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज वेळेत फेडलेले आणि २०२५-२६ मधील पीक कर्जही मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.

योजनेची अंमलबजावणी महा-आयटीच्या संगणकीय प्रणालीद्वारे सुरू आहे. बँकांनी आतापर्यंत ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती प्रणालीवर अपलोड केली आहे. त्यामध्ये १०.०१ लाख खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची, तर २१.१६ लाख खाती व्यापारी बँकांची आहेत.

२५ जुलै २०२६ रोजी आधार प्रमाणीकरणासाठी १६.९६ लाख पात्र कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या खात्यांचा समावेश आहे. उर्वरित तसेच दोन लाखांवरील थकबाकी असलेल्या खात्यांच्या याद्या पुढील टप्प्यात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेत, ग्रामपंचायतीत, विकास संस्थेत किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध यादीत आपले नाव तपासावे. त्यानंतर आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जाची माहिती पडताळून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

दोन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी पैसे भरायची गरज नाही,प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील दोन लाख रुपयांपर्यंतची पात्र थकबाकी शासन थेट माफ करणार आहे. त्यामुळे या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

शासनाने सर्व बँकांना १ एप्रिल २०२६ नंतर या योजनेतील पात्र कर्जखात्यांवर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच जुन्या अनुत्पादित कर्जखात्यांवर निश्चित निकषांनुसार सवलत देण्याचेही निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.

८ जुलै २०२६ पर्यंत ३.९६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून ही प्रक्रिया सुरू आहे. प्रमाणीकरणानंतर पात्र कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित कर्जखात्यात जमा केली जाईल. त्यानंतर कर्ज खाते नियमित होऊन शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज घेता येणार आहे.

ही योजना राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देणारी ठरणार आहेl

 

संबंधित पोस्ट

अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी दिल्यास प्रभाग क्र. 03 (अ) मध्ये प्रचंड ताकदीने निवडणूक लढवणार – अ‍ॅड.भगवान चांदोडे*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

जिल्हा नियोजनचा निधी 25 मार्चपूर्वी खर्च करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठीजलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगलीत जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta