
जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणूक; उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यांच्या पाठीशी शासनासह प्रशासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
हॉटेल फर्न रेसिडेन्सी, सातारा येथे पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात नवनवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, सातारा, तासवडे, खंडाळा या ठिकाणी मोठे उद्योग आहेत. येथील उद्योजकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. नागरिकांच्या हाताला काम देणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ध्येय आहे. उद्योजकांनी सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन करत उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
००००



