
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल होण्याचा व प्रवास टाळण्याचा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा सल्ला
जालना, प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हा वैद्यकीय यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली. उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा तसेच प्रवास टाळण्याचा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला होता. मात्र श्री. जरांगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल होण्यास संमती दिली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
श्री. जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. त्यांच्या प्रकृतीच्या निगराणीसाठी चोवीस तास तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक कार्यरत होते. त्यांच्या प्रकृतीची जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाकडून नियमित तपासणी करण्यात येत होती. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.१० वाजता केलेल्या तपासणीमध्ये श्री. जरांगे पाटील शुद्धीत व प्रतिसाद देण्याच्या स्थितीत होते. तथापि, त्यांना थकवा जाणवत होता व जीभ कोरडी असल्याचे आढळून आले. त्यांनी लघवीचा नमुना दिलेला नाही. तसेच शिरेद्वारे द्रवपदार्थ घेण्यास नकार दिला, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी अहवालाद्वारे दिली.
यापूर्वी दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री ९.४० वाजता केलेल्या तपासणी करण्यात आली. तसेच दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० आणि सकाळी ७.०५ वाजता त्यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला. श्री.जरांगे यांनी तपासणी व उपचार घ्यावे, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वेळोवेळी विनंती करण्यात आली. तसेच त्यांच्याशी वारंवार संवाद साधून तपासणी व उपचार करून घेण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास व रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.
सध्याची प्रकृती पाहता प्रवास करणे योग्य नसल्याचा सल्लाही श्री. जरांगे यांना देण्यात आला आहे. त्यांना प्रकृतीच्या संभाव्य धोक्यांची माहिती देऊनही श्री. जरांगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल होण्यास संमती दिलेली नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
****



