स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!
नवी मुंबई प्रतिनिधी
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई आता नियमित क्रमवारीपेक्षा वरच्या दर्जावर ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटगरीमध्ये समाविष्ट असून ‘सुपर स्वच्छ शहरा’चा मिळालेला बहुमान आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखा आहेच, सोबतच आपली जबाबदारी वाढविणारा असल्याचे मत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि सर्व नगरसेवकांसमोर आयुक्तांनी स्वच्छतेची चळवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय यशस्वी होणे शक्य नाही त्यामुळे याकामी नागरिकांचे संपूर्ण सहकार्य आणि सक्रिय सहभाग मिळण्यासाठी तसेच सर्वेक्षणांतर्गत सर्व नागरिकांनी अभिप्राय नोंदवावा याकरिता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षणा’मध्ये नवी मुंबई देशात सातत्याने अग्रभागी राहिलेली असून सन 2021 मध्ये देशात चौथा, सन 2022 मध्ये तिसरा, सन 2023 मध्ये तिसरा आणि सन 2024 मध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीमध्ये नवी मुंबईचा समावेश झालेला आहे.
मागील वर्षीपासून जी शहरे सातत्याने पहिल्या 3 क्रमांकात येतात अशा शहरांची स्पेशल कॅटेगरी ‘सुपर स्वच्छ लीग’ या नावाने बनविण्यात आलेली आहे, जेणेकरून इतर शहरांना क्रमांक मिळविण्याची संधी मिळावी अशी माहिती देत या ‘सुपर स्वच्छ लीग’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबईसह इंदौर, सुरत व विजयवाडा ही देशातील इतर 3 शहरे आहेत असे सांगितले.
‘सुपर स्वच्छ लीग’ कॅटेगरीमधील आपले मानांकन कायम राखणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी सर्वेक्षणांतर्गत एकूण गुणांपैकी 85 टक्के गुण मिळविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी 12500 गुणांची परीक्षा असून परीक्षण करताना ‘प्रत्यक्षदर्शी स्वच्छता अर्थात visible cleanliness’ ला प्राधान्य देण्यात येणार आहे.
साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षणाचे पाहणी पथक परीक्षणासाठी नवी मुंबईत दाखल होईल असा अंदाज असून यामध्ये ‘सिटी प्रोफाईल एरिया’तील विविध स्थळांना ते भेट देतील. तेव्हा प्रत्यक्ष पाहणीप्रमाणेच ते नागरिकांशीही संवाद साधतील आणि त्यांचे अभिप्राय जाणून घेतील अशी माहिती आयुक्तांनी दिली.
नवी मुंबईने आजवरच्या प्रवासात स्वच्छ सर्वेक्षणामधील आपले राष्ट्रीय मानांकन नेहमीच उंचावत ठेवले आहे व राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. यामध्ये अर्थातच सर्व लोकप्रतिनिधींचा, नागरिकांचा आणि आपल्या स्वच्छता कर्मचा-यांचा सर्वात महत्वाचा वाटा राहिला असे सांगतानाच गृहनिर्माण संस्था, वसाहती, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सारख्या नामांकीत स्वयंसेवी संस्था, मंडळे आमि व्यक्तिगत पातळीवर नागरिकांचाही मोठया प्रमाणात सहभाग लाभतो, यामुळेच हे यश लाभले आहे याचा आवर्जून उल्लेख आयुक्तांनी केला.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत मोठ्या संख्येने उपक्रम राबविणारी महानगरपालिका अशी आपली दखल घेतली जात असून या उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटक अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. विशेषत्वाने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, अगदी तृतीयपंथी नागरिकही या मोहीमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात असे ते म्हणाले.
मुलांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेची आवड निर्माण करून उद्याचे स्वच्छताप्रेमी नागरिक घडविण्याच्या दृष्टीने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, प्लास्टिक संकलनाचा ‘ड्राय वेस्ट बँक उपक्रम’ असे अनेक उपक्रम सातत्याने राबविले जात असून त्यामध्ये लाखो विद्यार्थी व त्यांच्यामार्फत त्यांचे पालक व कुटुंबीय या अभियानाशी जोडले गेले आहेत असे आयुक्तांनी आनंदाने सांगितले.
हे सारे काम सुरू असले तरी, स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय स्वच्छता अभियान यशस्वी होणे शक्य नाही हे लक्षात घेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग मिळण्याच्या दृष्टीने नगरसेवक हे लोकांचे प्रतिनिधी आहेत व त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश किंवा केले जाणारे आवाहन हे नागरिकांना जास्त जवळचे असेल या भावनेतून सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेविषयी सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी सभागृहाला केले.
स्वच्छतेविषयी सहज करण्यासारख्या आणि बारकाईने लक्ष देण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ज्यामध्ये, घरात रोज निर्माण होणारा कचरा घरातूनच ओला आणि सुका असा वर्गीकरण करून देणे. याशिवाय घरगुती घातक कचराही वेगळा ठेवणे व वेगळा देणे. सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा न टाकणे तसेच तो कचरापेटीतच टाकला जाईल याची दक्षता घेणे. उघड्यावर लघुशंका किंवा शौच न करणे. सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे. मोठ्या सोसायट्यांनी आपल्या आवारातच घनकचरा विल्हेवाटीची व्यवस्था करून दैनंदिन ओल्या कच-याची विल्हेवाट लावणे. थ्री आर सेंटर्सचा वापर करणे अशा विविध गोष्टी नियमितपणे करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात यावे.
तसेच सध्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने नागरिकांचे स्वच्छताविषयक अभिप्राय अर्थात सिटीझन फिडबॅक घ्यायला सुरूवात झालेली असून नागरिकांनी cf.sbmurban.org या वेबसाईट लिंकवर जाऊन किंवा स्वच्छता ॲप (Swachhata App), My gov Survey तसेच Vote for your city या तीन ॲपचा वापर करुन त्यावर शहर स्वच्छतेशी संबंधित 13 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देण्याकरिता नागरिकांना प्रेरीत करावे असेही आवाहन आयुक्तांनी याप्रसंगी नगरसेवकांना केले.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने प्रत्येक मानांकित शहराला ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत 5 शहरे जोडून देण्यात आली आहेत. या सर्वोत्तम स्वच्छ शहरांनी 5 लहान शहरांना स्वच्छतेतील गुणवत्ता वाढविण्याविषयी मार्गदर्शन करावयाचे आहे. यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडे कन्नड, जिंतूर, केज या 3 नगरपंचायती आणि लोणार व मलकापूर या 2 नगरपरिषदांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतील स्वच्छतेप्रमाणेच स्वच्छ शहर जोडीमधील 5 शहरांतील स्वच्छता गुणवत्तावाढीकडेही आपण लक्ष देत आहोत अशीही माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
नवी मुंबई शहराचा स्वच्छ, सुंदर व राहण्यायोग्य शहर म्हणून दर्जा टिकविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून नागरिकांच्या संपूर्ण सहयोगाने स्वच्छतेचे आपले ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील मानांकन कायम राखण्यासाठी एकत्रित येऊन काम करूया असे आवाहन याप्रसंगी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले.