
गणेशोत्सवाचा वारसा आता जागतिक डिजिटल संग्रहात; ‘bappa.org’ वर अनुभव, परंपरा आणि आरतीचा ठेवा डिजिटल स्वरुपात जतन करण्याचे आवाहन
राज्य प्रतिनिधी जालना,: गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भक्ती, संस्कृती आणि लोकजीवनाचा वारसा जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत ‘bappa.org’ हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेशभक्तांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या बाप्पाशी संबंधित आठवणी, परंपरा, पाककृती आणि आरतीचा ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवाशी संबंधित विविध प्रकारची माहिती एका जागतिक डिजिटल संग्रहात संकलित केली जात आहे. नागरिकांना आपल्या जालना जिल्ह्यातील गणेशोत्सवातील अनुभव आणि आठवणी शेअर करण्याबरोबरच घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरती रेकॉर्ड करून अपलोड करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आपल्या गणरायाचे छायाचित्रही या संग्रहात सहभागी करून घेता येणार आहे.
यासाठी नागरिकांनी ‘bappa.org’ या संकेतस्थळाला भेट देऊन ‘माहिती’ या पर्यायातून ‘तुमची कथा सांगा’ या विभागात प्रवेश करावा. येथे *कथा, पाककृती, परंपरा आणि थेट आरती* असे चार पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी आवश्यक पर्याय निवडून संबंधित माहिती भरावी. मोबाईलचे लोकेशन बंद असल्यास पिनकोड क्रमांक नोंदवावा.
bappa.org’ या संकेतस्थळावर गणपती बाप्पाच्या प्रसिध्द आरत्या व भक्तिगीते, गणेशोत्सवाच्या विविध परंपरा आणि नागरिकांचे अनुभव यांचा डिजिटल संग्रह उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक ओळख आणि लोकपरंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यास मदत होणार आहे. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील, परिसरातील आणि मंडळातील गणेशोत्सवाच्या परंपरा ‘bappa.org’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगासमोर आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
****



