शास्त्री चौक-काळीवाट रस्ता 27 सप्टेंबरपासून दोन महिने वाहतुकीस बंद
सांगली, प्रतिनिधी: सांगली शहरातील बसस्थानकाजवळील शास्त्री चौक ते हरिपूरकडे जाणाऱ्या काळीवाटपर्यंतच्या सुमारे 700 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी हा रस्ता दि. 27 सप्टेंबर 2026 ते 26 नोव्हेंबर 2026 या कालावधीत अटी व शर्तीचे अधिन राहून वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 115 व 116 अन्वये दिले आहेत.
सदर रस्त्याची रुंदी 8 ते 9 मीटर असून, 7 मीटर रुंदीचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी वाहतुकीसाठी मर्यादित जागा उपलब्ध होत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी रस्ता बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी वाहतूक मार्ग – हरिपूरकडून काळीवाट मार्गे वीर शिवा काशीद चौक ते आकाशवाणी मार्गे सांगली शहरात येता येईल. तसेच सांगली शहरातून याच मार्गाने हरिपूर गावाकडे जाता येईल
वाहतूक वळविण्याच्या दृष्टीकोनातून अटी व शर्ती-
1) रस्ता दुरुस्ती काम सुरु होते/संपते, पर्यायी सुरू होतो अशा ठिकाणी तसेच मुख्य रस्ताचे दोन्ही बाजूला “काम चालु असल्याने रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद आहे, हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरु आहे” असे मोठ्या आकारातील रेडीयमयुक्त माहितीदर्शक फलक व पर्यायी मार्गदर्शक फलक लावणे अत्यंत आवयश्क आहे.2) सदर रस्ता बंद असले मार्गावरून अत्यावश्यक वाहनांना सवलत देण्यात यावी.
3) रात्रीचे वेळी वाहनधारकांना दिसेल अशा पध्दतीने रस्त्याचे काम सुरु होते/ संपते अशा ठिकाणी मोठ्या आकाराचे दिशादर्शक फलक, रेडीयम रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर्स लावणे अत्यंत आवश्यक आहे
4) ज्या ठिकाणी काम होणार त्या ठिकाणी पर्यायी रस्त्याचे दोन्ही बाजूस २४ तासांकरीता ठेकेदार यांनी त्यांचेकडील सुरक्षारक्षक नेमणे अत्यंत आवश्यक आहे.5) सुरक्षेच्या दुष्टीने दोन्ही बाजूस संपूर्ण रस्त्यावर रात्री विद्युत पुरवठा चालू राहील याची संबंधीत ठेकेदार यांनी गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यक आहे.
6) वरील ठिकाणी काम चालू असताना अपघात झाल्यास किंवा अन्य काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत ठेकेदार हे त्याकरीता सर्वस्वी त्यास जबाबदार असतील
7) ठेकेदार यांनी नमुद ठिकाणी काम करीत असताना स्थानिक पोलीस बंदोबस्ताची गरज भासल्यास आवश्यकतेनुसार त्यांनी योग्य ते शासकीय शुल्क भरून पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे आहे.
उपाययोजना व दक्षतांची अंमलबजावणी होण्याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज व पोलीस अधिक्षक सांगली यांनी दक्षता घ्यावी. या निर्णयाची तात्काळ प्रभावीपणे व संपूर्णत: अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जारी केले आहेत.