vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उमरखेड मतदारसंघातील हायब्रिड ॲन्युईटी टप्पा-२ मधील रस्ते कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

उमरखेड मतदारसंघातील हायब्रिड ॲन्युईटी टप्पा-२ मधील रस्ते कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा..

मुंबई, प्रतिनिधी : उमरखेड विधानसभा मतदारसंघातील हायब्रिड ॲन्युईटी टप्पा-२ अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आढावा घेतला. आमदार किसन वानखेडे यांच्या विनंतीनुसार मंत्रालयातील मंत्री दालनात झालेल्या आढावा बैठकीत पुसद-गौळ-वसंतनगर-उमरखेड-ढाणकी-कुरळी रामा-२६२ या मार्गावरील किमी १/८०० ते ५७/०० या पॅकेज ५.१ सी आणि विडूळ-चालगणी-साखरा-खरूस-देवसरी ते जिल्हा सीमेपर्यंत प्रजिमा-६१ या मार्गावरील किमी ०/०० ते १८/४०० या पॅकेज ५.१ डीमधील अतिरिक्त कामांचा आढावा घेण्यात आला.

पुसद-उमरखेड हा मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा महत्वाचा राज्य मार्ग आहे. पोफाळी येथील साखर कारखान्यामुळे होणारी वाहतूक तसेच पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीनेही या मार्गाला महत्व आहे. या पॅकेजमध्ये संपूर्ण रस्ता सात मीटरऐवजी दहा मीटर रुंद करणे, उमरखेड शहर आणि पोफाळी येथे चौपदरीकरण करणे, प्रत्येक गावात बसथांबे उभारणे, चौकांमधील रस्त्यांची रुंदी वाढविणे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सिमेंट नाले बांधणे आदी अतिरिक्त कामांची मागणी आमदार वानखेडे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी या कामांसाठी आवश्यक अतिरिक्त खर्चाची माहिती दिली. अतिरिक्त कामे करावयाची असल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करणे किंवा प्रगतिपथावरील पॅकेजमधील कामांचा वाव अतिरिक्त कामांच्या किमतीइतका कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काम सुरू झाल्यानंतर उद्भवणारी अतिरिक्त कामे करारनाम्याच्या मंजूर किमतीच्या मर्यादेत करण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहितीही त्यांनी दिली.

विडूळ-चालगणी-साखरा-खरूस-देवसरी ते जिल्हा सीमेपर्यंतच्या पॅकेज ५.१ डीमधील कामाबाबतही बैठकीत चर्चा झाली. हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचा आणि कमी वाहतुकीचा असल्याने संपूर्ण लांबीतील काम मंजूर वावाप्रमाणे कार्यान्वित करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी केली. अतिरिक्त कामांसाठी प्रगतिपथावरील पॅकेजच्या अंदाजित मंजूर लांबीपैकी काही लांबी स्थानिक लोकप्रतिनिधीनी सुचविल्यानुसार कमी करावी आणि वगळण्यात येणारी लांबी हायब्रिड ॲन्युईटीच्या पुढील टप्पा-३ मध्ये प्रस्तावित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, उपसचिव (रस्ते) बोरसे, म.रा.पा.सु.वि. महामंडळ मर्यादितचे मुख्य अभियंता रणजित हांडे, विशाल जवंजाळ, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार (अ. अ. स्तर) प्रशांत पागृत आणि कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

छेडछाडीविरोधात आता तातडीने मिळणार पोलीस संरक्षण-महिला सुरक्षेसाठी ‘शी-बॉक्स’ पोर्टलचे अद्ययावतीकरण

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी दोषींवर कायदेशिर कारवाई करावी : जिल्हाधिकारी आशिमा मित्तलजिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठक संपन्न

जागतिक महिला दिन ८ मार्चसाठी विशेष लेख  महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस

भूमिहीन, नावावर सातबारा नसलेल्या महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळखनांदेड जिल्ह्यात ६९ हजार महिलांची महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी

देवस्थान इनाम जमिनींसाठी लवकरच कायदा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक,शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.