vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधनावर भर द्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन व नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शासनाचे सहकार्य

सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांनी संशोधनावर भर द्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन व नवोन्मेषाला चालना देण्यासाठी शासनाचे सहकार्य…

मुंबई, प्रतिनिधी : औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन व नवोन्मेषाला चालना देऊन आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, किफायतशीर आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे, संशोधन संस्था आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास या क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक धोरणात्मक व अन्य सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या गोरेगाव येथील मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली, एशियाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताने जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, अमेरिका आणि युरोपसारख्या कडक नियमन असलेल्या बाजारपेठांमध्येही भारतीय जेनेरिक औषधांची मोठी मागणी आहे. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे. आता या क्षेत्रात संशोधन आणि नवोन्मेष वाढविण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशात उभारण्यात येणारा बल्क ड्रग पार्क महत्त्वाचा ठरणार असून, त्यातून औषधनिर्मिती क्षेत्रात व्यापक बदल घडतील, असे त्यांनी नमूद केले.ॲस्ट्राझेनेकाने कोविड-१९ महामारीच्या काळात केलेले योगदान भारत कधीही विसरणार नाही. कोविशिल्ड लसीमुळे देशातील नागरिकांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत भारताने ९९ देशांना कोविड प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला. या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीय संस्कृतीची भावना जगासमोर प्रत्यक्षात आली. या कार्यात ॲस्ट्राझेनेकाचे योगदान महत्वपूर्ण होते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आरोग्यसेवेतील बदलांसाठी नवोन्मेष महत्वाचा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औषधनिर्मिती, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि निदान पद्धतींमध्ये नवनवीन संशोधन होत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करून मृत्यूचे प्रमाण अत्यल्प करण्याच्या दिशेने प्रयत्न होणे आवश्यक आहे. अचूक निदान, रुग्णाच्या गरजेनुसार उपचार आणि आधुनिक औषधांच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावता येईल. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी नवोन्मेष हाच महत्वाचा मार्ग आहे.

महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे आगमन होत असून, ॲस्ट्राझेनेकाने या विद्यापीठांसह तसेच राज्यातील नामांकित संशोधन संस्थांसोबत सहकार्य करावे. अशा सहकार्यामुळे संशोधनाला संस्थात्मक स्वरूप मिळेल आणि नवोन्मेष क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांच्या प्रतिभेचा उपयोग करता येईल. मुंबईतील मुख्यालयाच्या माध्यमातून कंपनीने संशोधन, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवेच्या विविध क्षेत्रांत विस्तार करावा. उद्योगांची वाढ ही राज्याच्या विकासाशी जोडलेली असल्याने महाराष्ट्र शासन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी सदैव सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांनी प्रास्ताविकात कंपनीच्या मुंबईतील मुख्यालयामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, भारताच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेशी आणि महाराष्ट्राच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या दृष्टिकोनाशी कंपनीचे उद्दिष्ट सुसंगत असून भारताला नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी औषधनिर्मिती आणि जैवऔषध क्षेत्रात संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे

ॲस्ट्राझेनेका ही जागतिक औषधनिर्मिती कंपनी असून, विज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये परिवर्तन घडविण्यासोबतच श्वसनविकार, जैवऔषधे आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांमध्येही कंपनी संशोधन करीत आहे. विज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त कार्य करण्याच्या भूमिकेतून कंपनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

00000

संबंधित पोस्ट

जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा 

मुंबईत रेबीज निर्मूलन प्रकल्प- दुसरा टप्पा चा शुभारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शुभ हस्ते…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीक विमा योजना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी * शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन * जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स अधिकृत विमा कंपनी

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

कृपया प्रसिद्धीसाठी ! मंदिरांमधील ‘पेड दर्शन’ सुविधा बंद करा आणि देवस्थानांमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta