
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी * शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन * जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स अधिकृत विमा कंपनी
बुलढाणा, प्रतिनिधी: खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, या वर्षासाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची अधिकृत विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
शेतकरी आपल्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), महा-ई-सेवा केंद्र, बँक किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत एनसीआयपी पोर्टलद्वारे पीक विम्यासाठी अर्ज करू शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी १० ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत विमा भरून आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विमा भरण्याच्या प्रक्रियेत किंवा पिकांच्या नुकसानीची माहिती देताना अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या समन्वयकांशी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, बुलढाणा जिल्ह्यासह सर्व तालुक्यांसाठी संपर्क अधिकारी उपलब्ध आहेत.
केंद्र शासनाच्या दि. ४ ऑगस्ट २०२६ च्या पत्रानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी विमा भरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीकनिहाय शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर) सोयाबीन ₹१ हजार २५०, कापूस ₹१ हजार ३००, तूर ₹ ९४०, मूग ₹ ७५, उडीद ₹ ६७.५०, मका ₹१०० याप्रमाणे आहे. प्रशासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
0000
3



