vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळाच्या बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळाच्या बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

चिखली: प्रतिनिधी

मानवसेवा मल्टीपर्पज फाउंडेशन, चिखली द्वारा संचलित ‘ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळा’च्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी सभागृहात बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला समाजातील शेकडो उपवर वधू-वरांनी उपस्थित राहून आपला परिचय दिला व उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सी. पी. इंगळे होते, तर उद्घाटक म्हणून इंजि. एन. के. सरदार उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुभाष राऊत, डॉ. विलास वाघ, कबीर पतसंस्था चिखलीचे अध्यक्ष प्रताप भांबळे आणि ‘लॉर्ड बुद्ध’चे प्रतिनिधी प्रा. गजेंद्र गवई,पत्रकार कैलास गाडेकर, पत्रकार पवन लढ्ढा, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धार्थ पैठणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे भाई विजयकांत गवई, प्रा मिलिंद हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना वक्त्यांनी बौद्ध समाजामध्ये विवाह परिचय मेळाव्यांची वाढती गरज अधोरेखित केली. विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांना जोडणारी सामाजिक प्रक्रिया आहे. युवक-युवतींना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळणे, तसेच शिक्षण, विचार, स्वभाव आणि परस्पर सन्मान यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा मेळाव्यांमुळे योग्य व्यासपीठ मिळण्यासोबतच समाजात परस्पर संवाद व एकोपा वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे विचार मार्गदर्शकांनी व्यक्त केले.

या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत मातोश्री कलाबाई वृद्धाश्रम व लीलाबाई देविदास काथवटे बेघर निवारा केंद्रासाठी ८ आर जागा उपलब्ध करून देणारे आणि वृद्धाश्रमासाठी टिनशेडचे बांधकाम करून देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व देविदास काथवटे व लीलाबाई काथवटे यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला विशेष सत्कार. समाजातील निराधार, बेघर आणि वयोवृद्ध आजी-आजोबांना हक्काचा निवारा मिळावा, त्यांचे उर्वरित आयुष्य सन्मानाने व सुरक्षितपणे व्यतीत व्हावे, या उदात्त हेतूने काथवटे दांपत्याने दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वतःची जागा देण्याबरोबरच बांधकामाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी सेवाभावी वृत्तीची साक्ष दिली आहे. या प्रसंगी सत्कारमूर्ती देविदास काथवटे यांचेही मनोगत व भाषण पार पडले.

मानवसेवा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून एकीकडे ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळाद्वारे विवाह इच्छुकांना जोडीदार शोधण्याचे व्यासपीठ मिळवून दिले जात आहे, तर दुसरीकडे मातोश्री कलाबाई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून निराधार वृद्धांना आधाराचे नाते दिले जात आहे. वधू-वरांचे ऋणानुबंध जोडण्यासोबतच वृद्धांच्या आयुष्यात आधाराचे नाते निर्माण करणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद निकाळजे यांनी केले, प्रभावी सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एस. एस. साळवे यांनी मानले. तर यशस्वीतेसाठी पत्रकार सुनील अंभोरे, प्रवीण डोंगरदिवे, विकास मोरे, सतीश पंडागळे, पंजाबराव आराख, प्रवीण खरात, विनोद कळस्कर राजू लहाने यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

आदिवासी विकास विभागाच्या सचिवांची पाचगाव ग्रामसभा व शासकीय आश्रमशाळेस भेट

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त

झुरळाच्या ( CJP ) राष्ट्र विरोधी आंदोलना विरोधात रत्नागिरीत सर्व सामान्य नागरीक रस्त्यावर उतरले!कोकणातून सुरु

ग्राहकांनी सतर्क राहून भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

vishwatmaklokswamivarta