
भाजपा नेते किरीट सोमय्या हल्ला प्रकरण; माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
मुंबई प्रतिनिधी
खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्यास भेटायला गेले होते. तेव्हा आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांत धाव घेत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांच्यासह चार शिवसैनिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोग्याच्या कारणास्तव त्यांचा जामीन मंजूर झाला असून सुटकाही करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली
रात्री उशिरा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलिस ठाण्यात दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. काच फुटल्यामुळे सोमय्या जखमी झाले होते. यावेळी खार पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सर्वांच्या समोर होते. ते प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत होते.
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलिस ठाण्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली होती. विक्रांत नौका घोट्याळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आली होती. यावेळी विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसैनिकांसोबत तिथे उपस्थित होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत चार जणांना अटक केल्याची माहिती खार पोलिसांनी दिली.



