vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

गुरुतत्वाचार

*🌺गुरुतत्वाचार🌺*

*|| ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद पाहिमाम् ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद रक्षमाम् ||*

*अर्जुनाला समोर उभे असलेले नातेवाईक बघून जो मोह निर्माण झाला त्याच्या भावना जागृत झाल्या आणि तो युद्धापासून परावृत्त व्हायला लागला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जे मार्गदर्शन केले त्यालाच श्रीमद भगवतगीता असे म्हणतात.*

 

*जय गुरुदेव……*

*(श्रीमद् भगवदगीता आणि श्रीमद् भागवत हे दोन्ही एक नाही, खूप जणांचा गोंधळ होतो याबद्दल आपण बघूया. )*

*श्रीमद् भगवदगीता :-*

*श्री व्यासऋषींनी महाभारत हे महाकाव्य लिहिले यात अठरा हजार श्लोक आहेत, त्यातील महायुद्धाच्या प्रसंगी ,अर्जुनाला समोर उभे असलेले नातेवाईक बघून जो मोह निर्माण झाला त्याच्या भावना जागृत झाल्या आणि तो युद्धापासून परावृत्त व्हायला लागला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जे मार्गदर्शन केले त्यालाच. श्रीमद् भगवदगीता असे म्हणतात, कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदांत यांबद्दल मार्गदर्शन केले आहे.भगवद् गीता ही मुळतः अर्जुनाला युद्धप्रवृत करण्यासाठी सांगितली गेली. परंतु अर्जुनाच्या जिज्ञासेमुळे भगवंताने कर्म, ज्ञान, संन्यास, भक्ती, श्रद्धा, त्रिगुण, देव, दानव संपत्ती, क्षेत्र क्षेत्रज्ञ अशा विषयांचे विवेचन करत अर्जुनाला मोक्षाच्या दारापर्यंत नेले, हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. हा ग्रंथ मनुष्याला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. हा ग्रंथ पूर्वी संस्कृत मध्ये होता.*

*श्रीमद् भागवत :-

*कलियुगाची ज्यावेळी सुरुवात झाली.तेव्हा राजा परिक्षित यांना शृंगी ऋषी कडून, त्यांनी शमीक ऋषींच्या गळ्यात मेलेला सर्प टाकल्याने, एक शाप मिळाला होता. तो असा की आज पासून सातवे दिवशी तुला तक्षक साप चावून तुझा मृत्यू होईल. तेव्हा शेवटचे सात दिवस काय करावे म्हणजे पाप कर्म नष्ट होतील, असे ऋषींना विचारले, तेव्हा आजन्म वैराग्य प्राप्त असलेले शुक मुनी यांच्या कडून आपण श्रीमद् भागवत कथा श्रवण करावी असे परिक्षित राजाला सांगितले हॊते.*

*श्रीमद भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलांचे वर्णन यात केलेले आहे. देवाची भक्ती करताना मनुष्य हा आसक्ती विरहित असला पाहिजे. यालाच श्रीमद् भगवतगीता किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात.श्रीकृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत होय. यात, भगवान श्रीकृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत.या ग्रंथात भक्ती योग, अध्यात्मिक विषयांवरील संभाषण वर्णन केले आहे.*

 

*🌹गुरुतत्वसेवक🌹*

 

*🌺|| गुरुतत्वाचार |*|| ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद पाहिमाम् ॐ श्री सद्गुरू समर्थ दत्तानंद रक्षमाम् ||*

 

*कर्मसंन्यासयोग अध्याय ५ .२६/४/२०२३

सन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्र्चितम् ॥ १ ॥

अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, एकदा कर्मसंन्यासाची व पुनः कर्मयोगाची तू प्रशंसा करतोस. तेव्हा ह्या दोहोपैकी अधिक श्रेयस्कर असेल तेच निश्र्चित करुन मला सांग.*

 

*जय गुरुदेव ,,,,,,,,*

*असाच गोंधळ आपला होत असतो ,मार्गदर्शक आपल्याला सांगत असताना आपण आपल्या मनाप्रमाणे तो समजून घेत असतो. त्या शब्दांमध्ये अडकत असतो. पण अध्यात्म हे शबदांच्या पलीकडे आहे. येथे सुद्धा संन्यास व कर्मयोग या बद्दल शंका निर्माण झाली. दोघांच्याही माध्यमातून साधकाला आनंदप्राप्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त होवू शकतो, संन्यास आणि योग (कर्म) हे वेगळे नाहीत. पण सर्व संग परित्याग करून संन्यास घेणे हे सर्वांना शक्य नाही. पण कर्मयोगाच्या माध्यमातून कोणीही आनंदप्राप्ती ही करू शकतो.*

*संन्यासावस्था म्हणजे हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे मानवाने चार अवस्था मधून मानवी जीवन सार्थक करावे यासाठी या चार अवस्था सांगितल्या आहेत. ज्या ईशवरातून आपली निर्मिती झाल, त्या ईशवरामध्ये परत जाणे हेच जीवनाचे उद्धिष्ट असते. आणि ते प्राप्त होण्यासाठी म्हणून जीवन हे ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य (गृहस्थाश्रम), वानप्रस्थ आणि संन्यास अशा चार आश्रमात विभागलेले आहे. ब्रह्मचर्याचे पालन करीत शिक्षण घेत उदरनिर्वाहाचे साधन साध्य झाल्यावर ,गृहस्थाश्रम करावा यातून समाज ऋण -पितृऋण फेडून प्रपंच सोडून देऊन वनात राहणे. आज वनच शिल्लक राहिले नाही म्हणून राहत्या घरातच आपल्या भार्येसह राहणे आणि यजमान पद हे मुलांना देऊन, स्वतः अलिप्त राहून ईश्वराचे चिंतन करीत आनंदात राहणे हेच आजचे वानप्रस्थाश्रम आहे संन्यासी मात्र भार्या आणि अग्नीचा त्याग करून परिवाजक (सदा भ्रमण करणारा संन्यासी) बनतो. वानप्रस्थ आणि संन्यास यांचे इतर नियम प्रायः सारखे आहेत. मनुष्याने चार आश्रमांचा एकापुढे एक अशा क्रमाने स्वीकार करावा किंवा ज्या साधकाची तयारी असेल तो पूर्वीच्या कोणत्याही आश्रमातून एकदम संन्यासाश्रमात प्रवेश करू शकतो.*

*समाजातले सर्वजण हे कर्माचरण करीत सर्वसामान्य जीवन जगणारेअसतात. त्यांच्या मनात सुख प्राप्त व्हावे यासाठी सतत उठत असणाऱ्या वृत्ती, इच्छा, वासना यांची पूर्ती करण्यासाठी ते अविरत कार्यमग्न असतात.पण हे करीत असताना सुद्धा सुख प्राप्त न होता दुःख मिळत आणि मन नैराश्य स्थितीत जाते, या सांसारिक जंजाळातून सुटाव, अस ज्यांना वाटेल ते कर्मयोगाचा मार्ग निवडू शकतात भगवंत गीतेत सांगतात की देहधारी जीव हा क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही. अगदी नीष्कर्म स्थितीला पोचलेला सांख्ययोगी, ध्यानाला जरी बसला असला तरी त्याचा श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण इत्यादी कार्य चालूच असत. कारण प्रकृतिगुणांपासून उत्पन्न झालेल्या देहाचे व्यापार चालूच असतात. यावरून हे निश्चित की कर्म माणसाला सुटत नाही. कर्ममार्ग हा सर्वाना सामावणारा असल्याने, तसच कर्म केल्याशिवाय निष्कर्म स्थितीही प्राप्त होत नसल्याने कर्ममार्ग हा सर्वांसाठी आहे.*

 

*🌹गुरुतत्वसेवक🌹*

 

*🌺|| गुरुतत्वाचार ||🌺*

 

*२७/४/२०२३*

 

*कर्मसंन्यासयोग अध्याय ५*

 

*संन्न्यासः कर्मयोगश्र्च निःश्रेयसकरावुभौ ।*

*तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ २ ॥*

*अर्थ ;- भगवान श्रीकृष्ण म्हणतात की , कर्मसंन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, परंतु त्यापैकीं कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता विशेष आहे.*

 

*जय गुरुदेव ,,,,,,,,*

*आपण मागील श्लोकातील अर्थात बघितले की , कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा प्रत्येक जण करू शकतो.कारण कर्माचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे . हे करण्यासाठी फार ज्ञान व साधना लागते. “श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणतात की , – कर्मसंन्यास (कर्मांचा त्याग) आणि कर्मयोग दोन्ही आपल्याला मोक्षाकडेच घेऊन जातात, या दोघांपैकी कर्मयोग हा कर्माच्या त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे, ही साधना करणे सुद्धा सोपे आहे. तसे तर दोन्हीही परम हितकारक आहेत, दोन्ही मार्गाने मोक्ष मिळू शकतो. पण यापैकीही कर्मयोग, ज्यामध्ये कर्म करताना यशाकडे वाटचाल होते . म्हणून तोच कर्ममार्ग श्रेष्ठ आहे – हे श्रीभगवान श्रीकृष्णाचे स्पष्ट मत आहे. ही शिकवण सर्व साधकांसाठी आहे – रणांगणावर उभ्या असलेल्या योद्ध्यासाठी आहे ,आणि भ्रमित झालेल्या अर्जुनासाठी मार्गदर्शन केले जात आहे. कर्माचा त्याग करण्याऐवजी श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितले की कर्म करीत जगणे उत्तम आहे “कर्मयोग हा सर्वोत्तम आहे.”*

*’कर्मसंन्यासी’, जो नित्य कर्मात रमतो, फळाची आशाही करीत नाही आणि या कर्माचा मीच कर्ता आहे; ही कर्तृत्वाची भावना म्हणजेच कर्तृत्वाचा अहंकारही मावळलेला असतो. नित्य-कर्म करूनही फलामध्ये आणि कर्मबंधात न अडकणारा – तोच कर्मसंन्यासी होय. । ‘संन्यास: कर्मयोगश्च’

या गीतेच्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कि – अर्जुना, सखोल विचार केला असता कर्मयोग आणि-

कर्मत्याग हे दोन्ही मोक्षदायकच आहेत. परंतु त्यातही कर्मयोग हा अधिक सोपा व सुलभ आहे. माऊली दृष्टांत देतात,*

*‘‘तरी जाणां नेणा सकळां ।हा कर्मयोगु कीर प्रांजळा।जैसी नांव स्त्रिया-बाळा । तोयतरणी ।।’’ ज्ञाने. ५- १६

पाण्यातून तरून जायचे आहे. ज्याला पोहता येते तो सहजपणे पैलतीरावर जाईल. पण ज्यांना पोहता येत नाही अशा स्त्रिया*

*आणि बालकांना नावेचा आधार घेऊनच पैलतीरावर जावे लागते. त्याप्रमाणे कर्मयोग हा सर्वांना तरून जाण्याचे नावेसारखे*

*सोपे साधन आहे त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच मार्ग सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणार्‍या फलाची प्राप्ती कमी कष्टाने होते.*

 

*🌹गुरुतत्वसेवक🌹*

 

*🌺|| गुरुतत्वाचार ||🌺*

 

*२८/४/२०२३*

 

*कर्मसंन्यासयोग अध्याय ५*

 

*ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।*

*निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३ ॥ भ.गीता*

*हे अर्जुना, जो मनुष्य कशाचाही द्वेष किंवा कशाचीही इच्छा करीत नाही, तो (कर्मयोगी) नित्य संन्यासीच समजावा. कारण तो रागद्वेषादि-द्वंद्वातीत झाला; आणि जो द्वंद्वातीत झाला तो कर्मबंधनातून सहज मुक्त होतो.*

 

*जय गुरुदेव…..*

*माणसाला राग का येतो तर त्याच्या मनाप्रमाणे ज्यावेळी काही घडत नाही किंवा कोणी तसा वागत नाही, त्यावेळी त्याला राग येतो. त्याच्या अपेक्षा,इच्छा या इतक्या प्रबळ असतात की त्या पूर्ण झाल्या नाही तर तो इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जातो. या रागाच्या भरात मग तो जे वागू नये तस वागतो, हा राग द्वेष केव्हा दूर होतो ज्यावेळी त्याला कोणाकडून कसलीही इच्छा, अपेक्षा किंवा कुठलाही स्वार्थ नसतो. स्वतः सगळ्यांसाठी चांगले कर्म करीत असतो पण कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवत नाही. असा वागणारा हा कर्मयोगीच आहे. आणि असा कर्म योगी संन्यासीच आहे. जरी त्याने संन्यास घेतला नसला तरी संन्यासीच आहे कारण तो सुख-दुःख, प्रेम-द्वेष ,जय-पराजय यांच्या पलीकडे गेलेला असतो. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात की ,असा कर्मयोगी हा भूतकाळातील गोष्टींची आठवण करीत नाही, काही मिळाले किंवा नाही मिळाले तरी त्याची इच्छा करत नाही, जो मेरु पर्वताप्रमाणे अंत:करणात अगदी स्थिर असतो. जसा पर्वतावर ऊन, वादळ, वारा, पाऊस पडले तरी त्याला कहीच फरक पडत नाही.” मी माझे ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ज्ञा. ५- २० ॥ माऊली म्हणतात की ज्याच्या अंत:करणात ‘’मी’’ व ‘’ माझे’’ यांचे स्मरणच राहिलेले नाही. तो कर्मयोगी सदोदित संन्यासीच आहे.त्याच्या मनात कुठलेच विषय नसल्यामुळे त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते.अशा कर्म योग्याला घरादाराचा त्याग करुन कुठेही जायची गरज नाही. कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावत: नि:संग झालेले असते.*

*अपेक्षा, स्वार्थ, आसक्ती हे वैयक्तिक मी आणि माझे याच्याशी निगडित असल्यामुळे यांच्या माध्यमातून केलेल्या सर्व कर्माचे फळ हे प्राप्त होत असतात. त्या कर्माचे फळ भोग भोगून संपल्या शिवाय पुढे गती नसते.यालाच कर्माचे बंधन म्हणतात, पण जो कर्मयोगी कर्मबंधनाच्या पलीकडे गेलेला असतो तो मुक्त असतो. म्हणून कार्मयोगी हा संन्यासीच असतो. जरी तो मग प्रपंच्यात असला तरी देखील तो मुक्त असतो. यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ” देखे अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तै ते कापुसे गिवसूये । जियापरी ॥ २३ ॥तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥ २४ ॥ पहा अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक रहातो तेव्हा त्याला कापसामधे सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते,त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही.म्हणून ज्यावेळेला कल्पना सुटते त्याचवेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसंन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत.*

 

*🌹गुरुतत्वसेवक🌹*

 

*सूचना:-* *गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटीमध्ये कोणतेही प्रापंचिक प्रश्न सोडवले जात नाहीत किंवा कुठलेही उपाय ,तोडगे असे काहीही दिले जात नाहीत.स्वतः आपण आनंदकुटीला या, सेवा साधना करा ,आणि अनुभूती घ्या,*प्रत्येकाची प्रापंचिक व परमार्थिक उन्नती व्हावी हेच गुरुतत्वाचे उद्दिष्ट आहे.*

 

*पत्ताः-* *”गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी, विश्वशांती सेवामार्ग”* *बेल्लेझा साईट प्लॉट नं. ०१ , अंजप फाटा, बोरीवली गाव नेरळ ( पश्चिम) ता.कर्जत*

 

*”गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी, विश्वात्मक विश्वशांती साधना मार्ग” अध्यात्मिक प्रचार,प्रसार व सामाजिक सेवाकार्य बोरीवली नेरळ, डोंबिवली*

 

*”गुरुतत्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात”*

*”गुरुतत्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म”*

 

*”गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेवा होय!”*

 

*”गुरुतत्व एक मार्गदर्शक”……*

संबंधित पोस्ट

वीरशैव लिंगायतांचे गोत्र आणि त्यांचे कुलदैवत भारतीय संस्कृती हि अनेक धर्म,पंथ,परंपरा

अखिल भारतीय वीरशैव जंगम पुरोहित अर्चक ज्योतिष *महासभा शाखा लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात करण्यात आली*

उमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रभु प्रसाद🌹🌹

vishwatmaklokswamivarta

*आनंदी पहाट* 🌻   *मातृवंदनाची..कृतज्ञतेची*  *आज जागतिक मातृदिन*

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर… ‘दिव्याची आवस’ म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप… म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल …..!!*