
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा तालुक्यात कलम 144 लागू
बुलडाणा, प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी, दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्याचा समावेश असल्याने याठिकाणी दि. 11 मे च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदूरा तालुक्याचा समावेश असल्याने येथे दि. 13 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यत मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये, सदर आचार संहितेचे यथायोग्य पालन होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध लागू केले आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात दि. 11 मे 2024 च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि. 13 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लागू केले आहे.
यामुळे सदर कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणाऱ्या किंवा जसाच्या तसा ऐकविणारे उपकरण संच लावणे, वापरणे आणि चालविण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.
मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी राहणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांना बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार आणि त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तीनाच प्रवेश राहणार आहे. या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मतदानकेंद्रात प्रवेशावर बंदी असेल. मतदारांना लाच देणे, मतदारावर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपट दाखविणे, तोतयेगिरी करणे, तसेच मतदान केंद्राचे 100 मीटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहणार आहे.
मतदारांना मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याचे प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खासगी कार, ट्रॅक, ऑटो रिक्शा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कूटर, मोटार सायकल आदी सर्व प्रकारच्या वाहनावर बंदी राहणार आहे मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राचे परिसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्ह आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी राहणार आहे. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल, अशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदारकेंद्राचे 100 मीटर परिसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरिता सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदार केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील. विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षा पथकास शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल. एका वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यास शस्त्राचे प्रदर्शन न करता
[: तसेच मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्षीत व्यक्तीस मतदान केंद्रात सोबत करता येईल.
ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल किंवा त्या व्यक्तीकडे खासगी सुरक्षारक्षक आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीस निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट आदी नेण्यास प्रतिबंध राहिल. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणूकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना सदर प्रतिबंध लागू राहणार नाही.
निर्बंधांचे कालावधीत रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर आणि नांदुरा तालुक्यामधील निवडणूक प्रचार दि. 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद होत असला तरी घरोघरी जाऊन प्रचारावर निर्बंधाचे कालावधीत प्रतिबंध असणार नाही. परंतू 5पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, अॅम्बुलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विद्युत विभाग, पोलीस, निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहित मार्गाने जाणाऱ्या बस गाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन, रेल्वे स्टेशन हॉस्पीटलकडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येण्याकरीता आजारी, दिव्यांग व्यक्तीचे वैयक्तीक वाहनास बंदी असणार नाही.
सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
00000



