व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी22 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत
राज्य प्रतिनिधी सांगली : सन २०२०-२०२१, २०२१-२०२२, २०२२-२०२३, २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या पाच वर्षांकरिता व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. व्यक्ती व संस्थांनी प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे व समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यात यावा. तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद व इतर कार्यकर्ऱ्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढवितांना सर्व समावेशकता निर्माण करणे, त्यायोगे पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेऊन “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला 15 हजार रूपये तर संस्थेस 30 हजार रूपये तसेच सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, एक शाल किंवा साडी, खण आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दिनांक १६ ऑगस्ट २०१२ अन्वये या योजनेच्या नियमावलीस मान्यता दिलेली आहे. ही नियमावली, विहित नमुन्यातील अर्ज इत्यादी सर्व बाबींची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी त्यांचे अर्ज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.