पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार
ठाणे, प्रतिनिधी – ठाण्यातील राम मारुती रोडवरील पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही शाळा येत्या 15 जून 2025 रोजी 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरी, ठाणे पूर्व ही संस्थेची शाळा जून 2025 मध्ये 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे. शतक आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन वर्षभर विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती आज एक पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या शतक महोत्सवी शाळेचे होणारे भव्य उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजन व मार्गदर्शन संस्थेचे कार्यवाह आल्हाद जोशी, शतक महोत्सव समिती प्रमुख श्रीमती करंदीकर मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. या नियोजनात शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले आहेत. इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरी, ठाणे पूर्व ही संस्थेची शाळा जून 2025 मध्ये 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या शाळेचा सुवर्ण महोत्सव संस्थेने तेवढ्याच मोठ्या दिमाखाने साजरा करण्याचे नियोजन केलेले आहे. या शाळेचा सुवर्ण महोत्सव उद्घाटनाचा कार्यक्रम 18 जून रोजी आयोजित केला आहे. न्यू इंग्लिश स्कूल या शतक महोत्सवी शाळेचा स्थापना दिन 15 जून 2025 रोजी मोठ्या दिमाखाने न्यू इंग्लिश स्कूल शाळेत साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवशी संस्थेतील शाळांचे शिक्षक, सर्व निवृत्त शिक्षक, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. शतक महोत्सवाचे उद्घाटन शाळेच्या मैदानावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते होईल. त्यानंतर भव्य प्रभातफेरी (रॅली) काढण्यात येईल. भोळे सभागृहात मुख्य कार्यक्रम व स्नेहभोजन होईल.
जून पासून सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा हे उपक्रम साजरे करण्यास सुरुवात होईल. 23 इंटर स्कूल व संस्थेतील शाळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे .सामाजिक उपक्रमात जूनमध्ये 100 गरीब विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश व शैक्षणिक साधनांचे वाटप. जुलैमध्ये 100 वृक्षांचे वृक्षरोपण व संगोपन करण्याचे ठरविले आहे. ऑगस्टमध्ये 500 राख्या विद्यार्थ्यांकडून बनवून सैनिकांना पाठविणार आहेत. सप्टेंबर मध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे असे उपयुक्त सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत.न्यू इंग्लिश शाळेची शतक महोत्सवी व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कोपरी या शाळेची सुवर्ण महोत्सवी डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्यात आली आहे. शाळेचा इतिहास व ऐतिहासिक अविस्मरणीय शाळेची क्षणचित्रे असलेली डॉक्युमेंटरी फिल्म शाळेचे शतक महोत्सवी उद्घाटन व समारोप यावेळी व विद्यार्थी पालक यांना दाखवली जाईल. त्यानंतर समाजासाठी सार्वजनिक केली जाईल.शतक महोत्सवी व सुवर्ण महोत्सवी शाळांचा गौरवशाली व सुवर्ण इतिहास, वर्षभरातील उपक्रम व कार्यक्रमांचा उत्सव, शाळा संस्थेची वाटचाल याविषयी स्मरणिका (प्रकाश अंक) शिक्षक, निवृत्त शिक्षक, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात येणार आहे व समारोपाच्या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. इंग्लिश स्कूल शतकपूर्ती व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरी, ठाणे पूर्व सुवर्णपूर्ती शेवटचा ऐतिहासिक टप्पाचा समारोप मोठ्या दिमाखाने जानेवारी 2026 मध्ये साजरा केला जाणार आहे. यातील दोन दिवसांचे कार्यक्रम हे गडकरी रंगायतनमध्ये आयोजनाचा मानस आहे. तर एक दिवस संस्थेच्या भोळे सभागृहात कार्यक्रम होईल. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. कार्यक्रमात संयुक्त स्मरणिकेचे प्रकाशन, मान्यवरांचे शाळेविषयी मनोगत, शाळेविषयी शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांचे शाळेचे विद्यार्थी व पालकांसमोर मनोगत, संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांचे निवडक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व शेवटच्या दिवशी संस्थेचे पदाधिकारी संस्थेतील सर्व शाळांचे शिक्षक, निवृत्त शिक्षक यांच्यासमवेत समारोप करण्यात येणार आहे इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात 15 जून 1926 रोजी त्यावेळच्या अत्यंत कठीण परिस्थितीत व मोठ्या कष्टाने कैलासवासी वामनराव भोळे सर यांनी केली. पुढे त्यांचे मित्र कैलासवासी के. बी. जोशी सर या दोघांच्या पुढाकाराने व मेहनतीने शाळा भरभराटीला आली.
शाळेच्या वाढत्या प्रगतीमुळे व व्यापामुळे नुसत्या सल्लागार मंडळापेक्षा संस्थेचीच आवश्यकता वाटू लागली म्हणून 1 एप्रिल 1936 मध्ये Life is work या ब्रीदवाक्याने मोठ्या जोमाने श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना झाली. कै. मो. शं. रांगणेकर हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष, कै. ना. के. भागवत, कै. एम. बी. वढावकर, कै. वा. ना. भोळे, कै. के. बी. जोशी, कै. रा. भि. पटवर्धन, कै. शं. के. पित्रे हे सर्व संस्थेचे पहिले संस्थापक सदस्य होते. शृंगारपुरे सर या शाळेचे पहिले लिपिक म्हणून कार्यरत होते.: पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा गौरवशाली इतिहास व वैशिष्ट्य म्हणजे 1) संस्थेने ठाणे जिल्ह्यात संस्थेची पहिली मुलींची न्यू गर्ल स्कूल शाळा सुरू केली. 2) ठाणे जिल्ह्यात एन.सी.सी. प्रशिक्षण देणारी न्यू इंग्लिश स्कूल ही पहिली शाळा. 3) संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणारी पहिली संस्था. 4) ठाणे जिल्ह्यात शिक्षकांची पतपेढी स्थापन करणारे आमदार कै. वसंतराव बापट सर या शाळेचे शिक्षक. 5) कै. वसंतराव बापट सर बारा वर्षे शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत कार्यरत होते. 6) शाळेचे काही हजारो विद्यार्थी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात देश-विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. 7) राजकीय क्षेत्रातही शाळेच्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटवला जसे एकनाथराव शिंदे साहेब, कै. वसंतराव डावखरे साहेब, कै. अनंत तरे साहेब यांच्यासारखे अनेक विद्यार्थी घडले. 8) ठाणे जिल्ह्यात आजही सी.बी.एस.सी.: शाळेसारख्या अद्यावत उच्च दर्जाच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा देणारी, पुरवणारी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आहे. 9) शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या मुलांसारखं इंग्रजी बोलता यावं यासाठी भाषा लॅब अध्यापनाची संस्थेकडून व्यवस्था करण्यात आली. 10) एवढ्या प्रदीर्घ कालावधीत संस्थेचे पाचवे अध्यक्ष रामचंद्र आपटे, चौथे कार्यवाह आल्हाद जोशी सर हे कार्यरत आहेत. यावरून या संस्थेचे नियोजन व व्यवस्थापन किती चांगले आहे हे लक्षात येते. 11) या संस्थेतील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे आजीव सभासद हेशाळेतील शिक्षकांमधून निवडले जातात व त्यांच्यातून संस्थेचे कार्यवाह निवडले जातात. या शतक महोत्सवी व सुवर्ण महोत्सवी शाळांची माहिती देताना संस्थेचे कार्यवाह आदरणीय आल्हाद जोशी सर व उपकार्यवाह बी. एस. तुरुकमाने सर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत महोत्सव प्रमुख मंगला करंदीकर मॅडम, संस्थेच्या गव्हर्निंग बॉडी सदस्या साधना शिंदे मॅडम, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. माळगावे सर, ज्येष्ठ शिक्षक बी. टी. पाटील यांनी शतक महोत्सवी व सुवर्ण महोत्सवी शाळांची माहिती दिली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूलचा इतिहास या विषयी श्री. माळगावे सर यांनी माहिती दिली साधना शिंदे मॅडम न्यू इंग्लिश स्कूलची ठळक वैशिष्ट्ये सांगितली. शतक महोत्सवी वर्षात कार्यक्रम व उपक्रम यांचे नियोजन कसे केलेले आहे याबाबत बी. टी. पाटील
यांनी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल सुवर्ण महोत्सव माहिती मंगला करंदीकर मॅडम यांनी दिली.