पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य..
ठाणे, प्रतिनिधी :- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग व आंबिया बहारामध्ये सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना मृग बहार सन 2025 मध्ये कोकण विभागात चिकू या फळपिकासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन 2025-26 मध्ये आंबा, काजू व केळी या फळपिकांसाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. दि.11एप्रिल,2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दि. 15 एप्रिल, 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. दि.11एप्रिल,2025रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तात्काळ काढून घ्यावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) साठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने या अॅग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी. अधिक माहितीकरिता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री. बालाजी ताटे यांनी केले आहे.