vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

प्रभु प्रसाद🚩 प्रसाद : संत शिरोमणी मन्मथ स्वामींचे पसायदान.🚩🕉

🚩 प्रभु प्रसाद🚩
प्रसाद : संत शिरोमणी मन्मथ स्वामींचे पसायदान.🚩🕉

*मन्मथ स्वामींनी ‘ परमरहस्य ‘ हा ग्रंथ पूर्ण केल्यानंतर जगद्रुप शिवपरमात्म्याकडे जगाच्या कल्याणार्थ बारा ओवीतून प्रसादरूपी दान मागितले . मन्मथ स्वामींनी शिवाकडे मागितलेले हे प्रसाद म्हणजे ‘ पसायदान होय.*

*प्रसाद हा दात्याला आणि घेत्याला दोघांनाही तृप्ती देतो म्हणून मन्मथ स्वामींनी प्रसादाची मागणी केली आहे . मन्मथ स्वामी आपल्या पसायदानाच्या पहिल्या दोन ओवीतून आपल्या परंपरेला अनुसरून शिवपरमात्म्याचे वर्णन करून तिसऱ्या ओवीत त्याच्याबद्दल कृतज्ञताभाव प्रकट करीत प्रसादरूपी आशीर्वाद मागतात .*

*जे शब्दसृष्टीचे ईश्वर । सबरा भरीत अगोचर ।*
*निर्लेप मंगल साचार । परम वंद्य जें ।।१ ।।*
*नमू तया परमेश्वरा । जगद्रुपा जगदाधारा ।*
*जगनिर्मात्या महेश्वरां । सच्चिद्रुपा जी ।।२ ।।*
*जो मी वाग्यज्ञ आरंभिला । तो हा तुम्ही पूर्ण केला ।*
*कृपा करोनी पाहिजे दिधला । आशीर्वाद हा ।।३ ।।*
*जो शब्द सृष्टीचा अधिष्ठाता आहे . ज्ञानेंद्रिय कक्षेच्या पलीकडील सबराभरित पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे आहे . ज्याची दृष्टी शुद्ध , शुचिर्भुत आणि कल्याणकारी आहे . जो परम वंदनीय आहे .* *आपण त्या परमेश्वराला नमन करतो . जो कुठल्या धातू दगडाच्या मूर्तीत आणि देवळात सीमित नसून असीम आहे . संपूर्ण जगाचा उद्गाता आणि उद्धारक आहे . जो सत्य , ज्ञान आणि आनंदरूप आहे . त्या शिव परमात्म्यामुळेच आपण आरंभिलेले वाग्यज्ञ पूर्ण झाला असा कृतज्ञताभाव मन्मथ स्वामी प्रकट करतात .*
*’ किंबहुना तुमचे केलें । धर्मकीर्तन हे सिद्धी गेलें ।*
*येथ माझे जी उरलें । पाईकपण ।।*

*या ज्ञानेश्वरीतील शेवटच्या ओवीतून संत ज्ञानेश्वरांनी जसा परमेश्वराबद्दलचा कृतज्ञताभाव प्रकट केला . तोच भाव काहीशा निराळया शैलीत मन्मथ स्वामींनी येथे शिवाला उद्देशून प्रकट केला . आपण केलेल्या वाग्यज्ञाने संतुष्ट मागतात . विशेषतः जगातील दुष्ट दुर्जनांसाठी अग्रक्रमाने मागतात . होऊन आशीर्वाद दयावा अशी मागणी केली . पण हा आशीर्वाद स्वतःसाठी न मागता जगासाठीच मागतात. विशेषतः जगातील दुष्ट दुर्जनांसाठी अग्रक्रमाने मागतात.*
*जे दुष्ट दुर्जन अमंगळ । त्यांची हृदये होओत निर्मळ।*
*कळीकाळ सकळ ।निरसोनी जाय।।४ ।।*

*मन्मथ स्वामीचे अंतःकरण माउलीचे असल्यामुळे चांगल्यापेक्षा वाईटाची काळजी त्यांना अधिक वाटते . एखादी आई ज्याप्रमाणे चांगल्या पेक्षा वाईट मुलाची अधिक काळजी करते .* *त्याचप्रमाणे मन्मथ स्वामी दुष्ट दुर्जनासाठी अगोदर मागणी करतात . जगातील सर्व हिंसाचार अशांतीचे मूळ दुष्ट दुर्जनाच्या मनातील दुर्विचार असतात . हे जाणून समस्येच्या मुळावरच घाला घालण्याच्या भूमिकेतून दुष्टांच्या मनातील दुष्ट विचार नाहीसे होऊन त्यांचे अंत : करण निर्मळ व्हावे . त्यामुळे कळीकाळाचे भय आपोआपच संपेल असा विश्वास मन्मय स्वामी येथे व्यक्त करतात . दुष्टांच्या मनातील विघातक विचार गेल्यानंतर निर्मळ झालेल्या त्याच्या मनात कल्याणकारी विधायक विचार रूजावेत . म्हणजेच जगातील दुष्टांचे पर्यावसान सुष्टामध्ये व्हावे अशी मागणी मन्मथ स्वामी करतात .*

*जे जे दिसे दृष्टीपुढे । ते ते अवघे शिवरूप गाढें ।*
*ऐसिया संताची हुडे । निर्भय हिंडो।।५ ।।*
*जगातील प्रत्येक जीवामध्ये शिव पाहणाऱ्या संतांची संख्या वाढावी . अशा सदाचारी संत सत्पुरुषाचे समूह तयार व्हावेत आणि ते या जगात निर्भयपणे वावरावेत अशी प्रार्थना मन्मथ स्वामी करतात . दुष्ट दुर्जन लोक सदेव संघटीत राहतात . पण सज्जनांचे संघटन अपवादानेच आढळते . यामुळे दुष्टांची शक्ती वाढून सज्जन बाजूला पडतात . सत्य झाकोळल्या जाते आणि असत्याचा मात्र बोलबाला होतो . म्हणून मन्मथ स्वामींना सज्जनांचे संख्याबळ आणि संघटन महत्त्वाचे वाटते . समाजात दुष्टांची संख्या घटून सुष्टांची संख्या आणि संघटन वाढते . तेव्हा शांतीचे साम्राज्य निर्माण व्हायला वेळ लागत नाही . सामाजिक स्थैर्यातच प्रगतीची मुळं दडलेली असतात . प्रगतीतूनच सुखाचा सुकाळ होऊन दुःख दारिद्रयाचा लोप होतो . म्हणून मन्मथ स्वामी आपली पुढील मागणी त्या दृष्टीने करतात.*

*सर्व सुखाचा हो सुकाळ । दुःख दारिद्रय छळ ।*
*नष्ट होओ सकळ । मनोमालिन्यही ।।६ ।।*
*जे का शिवभक्तजन । त्यांच्या दरुशने पावन ।*
*सकळ सृष्टीचे जीवन । होतु आनंदे।।७ ।।*
*सदाचारी संत सज्जनांची संख्या वाढल्यानंतर सर्व प्रकारच्या सुखाचा सुकाळ व्हावा . दुःख,दारिद्रय,छळ नाहीसे होऊन शोषण आणि विषमतारहित समाज निर्माण व्हावा .* *प्रत्येकाच्या मनातील मालीन्य म्हणजे अमंगल विचार नाहीसे होऊन सर्वांची मने शुद्ध आणि पवित्र व्हावीत.*
*स्वामीची शिवाकडे प्रार्थना आहे . अशा पवित्र शिवभक्ताच्या दर्शनाने सर्व चराचर सृष्टीचे जीवन आनंदमय व्हावे .ही मन्मथ स्वामींची शिवांकडे प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या पसायदानात लोकांच्या मनातील अज्ञानाचे द्वैताचे तिमीर नाहीसे होऊन ज्याच्या ज्याच्या मनात ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होवोत असे स्वप्न पाहतात . मन्मथ स्वामी मात्र सकळ सृष्टीचे जीवन आनंदाने भरून जावे अशी प्रार्थना करतात . मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतरची आनंदाची अवस्था असते . मन्मथ स्वामी आपल्या पसायदानात साधनापेक्षा थेट साध्यालाच हात घालतात .*
*’ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।*
*अनवरत भूमंडळी । भेटतू भुतां ।। ‘*
*या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी जगात मांगल्याचा वर्षाव होण्याच्या दृष्टीने ईश्वरनिष्ठलोकांची संख्या वाढावी . त्यांचा दिव्य सहवास सर्व भूतमात्रांना लाभावा अशी मागणी करतात . हाच विचार मन्मथ स्वामींच्या पसायदानातून निराळया पद्धतीने साकारला आहे .*

*या माझ्या जगती तळी । सर्वत्र संचरो भक्त मंडळी ।*
*शिवभक्ताची नव्हाळी । नित्य लाभो जगा ।।८ ।।*
*जे जे अमंगळ या भुवनी । ते ते लोपो शूलपाणि ।*
*सुमंगल भाव या जनी । उपजो सदा ।।९ ।।*
*जगात शिवाचारनिष्ठ सदाचारी शिवभक्तांची केवळ मांदियाळीच न वाढता त्याचा समाजात संचार वाढावा अशी मन्मथ स्वामींची भूमिका आहे . सदाचारी ज्ञानी लोक एकाच ठिकाणी बसून निष्क्रीय राहिली तर त्याचा समाजाला कोणताही लाभ होत नसतो . ती समाजात मिसळून क्रियाशील राहिली तर त्यांचे आचार विचार लोकमनात रूजतात . म्हणून सर्वत्र शिवभक्तांचा संचार व्हावा अशी मागणी मन्मथ स्वामी आग्रहपूर्वक करतात .* *सदविचाराची रूजवणूक झाल्यानंतर मनातील अमंगळ विचार आपोआपच लोप पावतात . सदाचारी शिवभक्ताच्या सहवासात कल्याणकारी विचार मनात उपजतात असा विश्वास येथे प्रकटला आहे . मन्मथ स्वामींनी किती उदात्तमंगल भूमिकेतून विश्वाकडे पाहिले आणि वेळोवेळी किती उत्कटपणे समाजहिताची कळकळ वाहिली . याचा प्रत्यय या पसायदानातून पदोपदी येतो .*
*वाढोलोकी सदाचार । सद्विद्येचा भडिमार ।*
*होवो सर्वत्र साचार ।हाची प्रसाद आवडे ।।१० ।।*
*संतांचा सहवास नित्य लाभावा त्यातून समाजमनाची मशागत होवून सदविचाराची उपज व्हावी . ते सदविचार कृतीत उतरून जगाचे कल्याण साधावेही मन्मथ स्वामींच्या मनातील तळमळ आहे . त्यातूनच लोकांत सदाचार वाढून सद्विद्येचा सतत भडिमार व्हावा अशी प्रार्थना ते करतात.* *संत ज्ञानेश्वरांनी*
*’ आणि ग्रंथोपजिवीयें । विशेषी लोकी इयें ।*
*दृष्टादृष्ट विजयें । होआवेजी ।।*
*’ या ओवीतून ग्रंथगत विचार आत्मसात करून तशी वाटचाल करणाऱ्या कृतीशील ज्ञानी लोकांचा गौरव केला आहे . मन्मथ स्वामींनी सदविद्येचा भडिमाराची जी अपेक्षा व्यक्त करतात त्यातून अप्रत्यक्षपणे सदविद्येचे महत्त्वच अधोरेखित करतात . समाजामध्ये सदाचाराचा भडिमार होण्याच्या दृष्टीने आपल्या हातून पुन्हा असेच वाग्यज्ञ घडावे . यास्तव आपला असाच कृपाप्रसाद लाभावा अशी प्रार्थना शेवटी करतात.*

*आणीकही ऐसे करावे । सुखाचे मळे पिकवावे ।*
*अमूलाग्र नासूनि जावे । विघ्न बाधा ।।११ ।।*
*ही माझी वाक्पुष्प पूजा । समर्पण हो श्रीगुरुराजा ।*
*मन्मथशिवलिंग विनवी ओजा।श्रीगुरु नागेशासी ।।१२ ।।*
*आपल्या अखंडित वाग्यज्ञातून समाज ज्ञानी बनून शाश्वत सुखाचे मळे पिकावेत . मोक्षमार्गातील सर्व अडथळे नाहीसे व्हावेत . माझी वाङ्मयीन सेवा स्वीकारून तृप्त व्हावे अशी विनवणी मन्मथ स्वामी आपले गुरू नागेशाकडे करतात . मन्मथ स्वामींनी ग्रंथाच्या शेवटी श्रीगुरुच्या साक्षीनेशिव शिवपरमात्म्याकडे जगाच्या कल्याणार्थ मागितलेला प्रसाद म्हणजे ‘ परमरहस्य ‘ या ग्रंथाचे सारच होय. या पसायदानातून मन्मथ स्वामींच्या एकंदर साहित्याचे मूलभूत प्रयोजन स्पष्ट होते .*

*संदर्भ*🚩
*संत मन्मथ दर्शन*
🙏🙏🙏🙏🙏
शिव कथाकार वे मु माहेश्वरमुर्ती विरभद्र स्वामीजी महाराज कुंभार पिंपळगाव

संबंधित पोस्ट

गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज -संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण @ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद –

vishwatmaklokswamivarta

कोणाही जीवाचा न घडो मत्सर -वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ||

महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. ॐ मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः

नवीन वर्षात ज्ञानालाच मार्गदर्शक होऊ दे*  *गुरुदेव श्री श्री रविशंकर* 

| श्री शिवलीलामृत || मराठी अर्थ ||अध्याय पाचवा ||

vishwatmaklokswamivarta

              ‼️ *प्रवचन*‼️ *श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*   *३१ मे*