‘लखपती दिदी’ अभियानाला गती; महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*
गडचिरोली, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांमधील महिलांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त योजनांचा लाभ समन्वयाने महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘लखपती दिदी’ जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक 10 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपन्न झाली. यावेळी ते बोतल होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, ‘लखपती दिदी’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. विविध विभागांच्या योजनांमधून महिलांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रत्यक्ष मदत केली तरच अभियानाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधून प्रत्येकी ५ ते १० महिलांची निवड करून सध्या ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ७० ते ७५ हजार रुपये आहे अशा महिलांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात यावा. त्यानंतर २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या उत्पन्नात झालेल्या बदलाचा आढावा घेऊन मॉडेल पद्धतीने काम करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. या प्रक्रियेत एकल महिलांना प्राधान्याने समाविष्ट करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत पॅकेजिंग, ब्रँडिंग व लेबलिंगसारख्या उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष गरजा व मागणी लक्षात घेऊन त्याबाबत माहिती संकलित करण्यासाठी सर्व विभागांनी स्वतंत्र माहितीपत्रक तयार करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली सुहास गाडे यांनी एकल महिलांची यादी सर्व संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्याची सूचना केली, जेणेकरून विविध योजनांचा लाभ त्या महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येईल.बैठकीच्या प्रारंभी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली राहुल काळभोर यांनी प्रस्तावना मांडून ‘लखपती दिदी’ अभियानाची माहिती दिली. देशभरात २ कोटी महिलांना ‘लखपती दिदी’ बनविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट या अभियानातून ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रकल्प संचालक राहुल काळभोर तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.