vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

#महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

व्यवसायिक प्रतिनिधी

     “शिक्षण तर पूर्ण झाले होते, पण हातात हक्काचा रोजगार नव्हता. नोकरीतून मिळणारे उत्पन्न अत्यंत तोकडे असल्याने भविष्याची चिंता होती. पण जेव्हा कौशल्याची जोड मिळाली, तेव्हा स्वप्नांना उभारी मिळाली,” हे शब्द आहेत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील देव्रुंगपाडा येथील सौ. भावना सागर गोडे यांचे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे काम भावना ताईंनी आपल्या जिद्दीच्या जोरावर केले आहे.    अत्यल्प उत्पन्नाकडून उद्योजकतेकडे झेप

     पदवीधर असलेल्या भावना गोडे या सुरुवातीला एका खाजगी ठिकाणी नोकरी करत होत्या. मात्र, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात कुटुंबाची आर्थिक प्रगती साधणे कठीण होत होते. काहीतरी स्वतःचे करावे ही इच्छा मनात होतीच, त्याच दरम्यान त्यांना स्वयं सहायता गट (SHG) आणि ईएपी (EAP) कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), ठाणे’ बद्दल माहिती मिळाली. ही माहिती त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

     ३० दिवसांच्या प्रशिक्षणाने दिला नवा दृष्टिकोन

     भावना ताईंनी आरसेटी (RSETI) संस्थेमध्ये ‘ब्यूटी पार्लर मॅनेजमेंट’ या ३० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. जून २०२३ मध्ये घेतलेल्या या प्रशिक्षणात त्यांना केवळ सौंदर्याचे उपचारच नव्हे, तर व्यवसाय कसा हाताळावा, ग्राहकांशी संवाद कसा साधावा आणि आर्थिक नियोजन कसे करावे, याचे सखोल मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील सुप्त आत्मविश्वासाला खऱ्या अर्थाने जाग आली.     स्वतःच्या जिद्दीवर व्यवसायाची मुहूर्तमेढ

    प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर भावना ताईंनी वेळ न घालवता २८ सप्टेंबर २०२३ रोजी स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू केला. कोणत्याही बाह्य कर्जाची वाट न पाहता, स्वतःकडील ५० हजार रुपयांच्या भांडवलातून त्यांनी आवश्यक साहित्य आणि उपकरणांची खरेदी केली. आज त्यांच्या पार्लरमध्ये मिळणाऱ्या दर्जेदार सेवांमुळे परिसरातील महिलांचा त्यांच्यावर विश्वास वाढला असून, त्यांना दरमहा सरासरी ११,५०० रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळत आहे.

     इतर महिलांसाठी बनल्या प्रेरणास्थान

     “मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असे मानणाऱ्या भावना ताईंच्या जीवनात आज सकारात्मक बदल झाले आहेत. त्या केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या नाहीत, तर समाजातही त्यांची एक ‘यशस्वी उद्योजिका’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार करून इतर गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

     शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ घेतल्यास ग्रामीण भागातील महिला देखील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनू शकतात, हेच सौ. भावना गोडे यांच्या या ‘यशस्वी प्रवासा’ने सिद्ध केले आहे.

संबंधित पोस्ट

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत तज्ज्ञ समितीद्वारे सकारात्मक मार्ग काढणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ.. जागतिक तणावाचा बाजारपेठेवर परिणाम; पाहा आजचे ताजे दर

vishwatmaklokswamivarta

फेरफार प्रकरणे निकाली काढण्यासाठी दि.१५ रोजी विशेष अदालतींचे आयोजन-जिल्हाधिकारी  यांचे आदेश; दि.७ ते १५ कालबद्ध कार्यक्रम

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी