vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.

या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलरसेल, मॉडयुल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बैटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.

यामध्ये नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. 800 कोटींची गुंतवणूक करून 500 जणांना रोजगार देणार आहे. अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि.1,000 कोटीं गुंतवणूक करत आहे तर छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. 1,000 कोटींची गुंतवणूक करून 1000 नवीन रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. 1500 कोटींच्या गुंतवणुकीतून 3000 लोकांना संधी देणार आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. 3,135 कोटींची गुंतवणूक करून 8000 जणांना रोजगार देणार आहे.अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस 4,000 कोटींच्या गुंतवणुकीसह 1000 रोजगार निर्माण करेल.पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. 4,200 कोटींची गुंतवणूक आणि 12,000 रोजगार निर्मिती करेल. चंद्रपूरमध्ये मिलीयन स्टील प्रा. लि. 256.01 कोटींच्या गुंतवणुकीतून 360 रोजगार देणार आहे. भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. 10,000 कोटींची मोठी गुंतवणूक करून 1000 रोजगार उपलब्ध करेल. नागपूरच्या बुटीबोरी येथे अॅकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. 11,400 कोटींची गुंतवणूक आणि 7000 रोजगार निर्माण करेल.तर याच कंपनीचा रायगड/पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्प 11,000 कोटींची गुंतवणूक आणि 2500 रोजगार देईल.

नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. 12,780 कोटींच्या गुंतवणुकीतून 6825 जणांना काम देणार आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये 15,430 कोटींची गुंतवणूक करून 3600 रोजगार निर्माण करेल. रायगड येथे बालासोर अलॉयज 17,479 कोटींची गुंतवणूक आणि 3200 रोजगार देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. 27,515 कोटींची गुंतवणूक करून 4000 रोजगार निर्माण करेल. रायगड/पालघरमध्ये अॅकमे क्लीनटेक प्रा.लि.चा ग्रीन अमोनिया प्रकल्प 37,800 कोटींची गुंतवणूक आणि 4500 रोजगार घेऊन येत आहे. गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. 40,000 कोटींची भव्य गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्माण करेल. सर्वात मोठी गुंतवणूक एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये 56,852 कोटींच्या रूपात होणार असून, त्यातून 25,000 जणांना रोजगार मिळणार आहे.

या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचा संवाद

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई कांदिवली येथील ग्रॉवेल्स १०१ मॉल’  तत्काळ बंद करा;  मुंबई हायकोर्टाचा एमपीसीबीला आदेश

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

पर्यावरणपुरक गणेश विसजर्नाचा कोंढवली गावाने घालून दिला आदर्श..

vishwatmaklokswamivarta