vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील बीकेसी येथे २ ते १४ मे दरम्यान महालक्ष्मी सरस चे आयोजन महिला उद्योजिकांसाठी भव्य उपक्रम

मुंबईतील बीकेसी येथे २ ते १४ मे दरम्यान महालक्ष्मी सरस चे आयोजन’महिला उद्योजिकांसाठी भव्य उपक्रम

मुंबई, प्रतिनिधी : महालक्ष्मी सरस महाराष्ट्रात महिलांच्या सक्षमीकरणाचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास येत आहे. राज्यात ५० लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ सक्रिय आहेत. या महिला केवळ उद्योजिका नसून, त्या रोजगार निर्माण करणाऱ्या तसेच आपले कुटुंब व समाजाच्या आर्थिक प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ठरत आहेत. अशा महिला उद्योजकांचे ‘महालक्ष्मी सरस’ हे प्रदर्शन २ ते १४ मे या कालावधीत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन महिला उद्योजिकांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळा अनुभव देणारे ठरेल, असा विश्वास ‘उमेद-एमएसआरएलएम‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मुंबई प्रेस क्लब येथे प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उमेदचे मुख्य परिचालन अधिकारी निखिल ओसवाल उपस्थित होते. यावेळी निलेश सागर म्हणाले की, उमेद अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस आता एक व्यापक रूप धारण करत आहे. या माध्यमातून महिलांना रोजगारासोबत आत्मनिर्भरता, नेतृत्व आणि सामाजिक ओळख मिळत आहे. ही चळवळ ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. महिला उद्योजिका आता पूर्वीप्रमाणे केवळ वाळवणीचे पदार्थ नव्हे तर ग्रामीण भागात शेतमाल आधारित प्रक्रिया उद्योगही उमेदीने करत आहेत. महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनसारख्या उपक्रमाद्वारे महिला उद्योजिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. आतापर्यंत महिलांना ५०,००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे. केवळ मागील वर्षातच १०,००० कोटी रुपयांचे कर्ज महिला उद्योजिकांना देण्यात आले. महत्वाचे म्हणजे महिला उद्योजिकांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण हे तब्बल ९८ टक्के आहे. राज्यात ५० लाखांपेक्षा जास्त लखपती दीदी निर्माण झाल्या असून, त्यांच्या उत्पन्नात सातत्य राहावे, यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे निलेश सागर यांनी सांगितले.

या प्रदर्शनात एकूण ५०० स्टॉल्स उभारण्यात असून यात यामध्ये महाराष्ट्रातील २३०, इतर राज्यातील ६६, नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या महिला गटांचे ६८ तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीओ) ३४ स्टॉल्स समाविष्ट आहेत. याशिवाय नाबार्ड, माविम, खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई महानगरपालिका तसेच आदिवासी व कृषी विभागासह विविध शासकीय संस्थांचे २२ स्टॉल्सही यात आहेत. प्रदर्शनातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ८० स्टॉल्सचा वातानुकूलित फूड कोर्ट, जिथे राज्यातील विविध भागातील महिलांनी तयार केलेले पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध असतील. तसेच हातमागाची वस्त्रे, वारली व बंजारा कला, लाकडी खेळणी, आकर्षक दागिने आणि इतर ग्रामीण उत्पादने खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. खरेदी केलेल्या सामानाच्या पिशव्या ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. उमेद परिवारात जवळपास ६५ लाख सदस्य आहेत. त्यांना येथे आपआपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे, असे निलेश सागर यांनी सांगितले.

पुढे म्हणाले की, यावर्षी महालक्ष्मी सरसमध्ये एआर फोटोग्राफी, अ‍ॅनामॉर्फिक वॉल्स आणि इन्फोग्राफिक वॉल्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी २५ किलोमीटर परिसरात मोफत होम डिलिव्हरीची सुविधादेखील उपलब्ध आहे. येथे महाराष्ट्राव्यतिरिक्त केरळ, गुजरात, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश यासह अनेक राज्यांचे ६० पेक्षा जास्त स्टॉल्स राहतील.महिलांना केवळ विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश नाही, तर त्यांना संघटित, टिकाऊ आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योजिका बनवण्याचे ध्येय आहे. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. यावर्षी ‘कंटेनर’ या संकल्पनेद्वारे महिला उद्योजकता आता निर्यात, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागतिक संधींकडे झपाट्याने वाटचाल करत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, ब्रँडिंग आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिलांना नवी ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांची उत्पादने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी शासन शासन कटिबद्ध आहे, असेही श्री सागर यांनी यावेळी सांगितले.

महालक्ष्मी सरस आता केवळ वार्षिक उपक्रम न राहता दीर्घकालीन आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल बनत आहे. हा पुढाकार ग्रामीण महिलांना आर्थिक समावेशन, डिजिटल सशक्तीकरण आणि ब्रँडिंगसारख्या महत्त्वाच्या घटकांशी जोडत आहे. आजची महिला उद्योजिका केवळ उत्पादने विकत नाही, तर आपल्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळखही जागतिक स्तरावर पोहोचवत आहे. भविष्यात ई-कॉमर्स, निर्यात जाळे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे या उपक्रमाचा अधिक विस्तार होईल. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच महाराष्ट्राच्या एकूण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा विश्वास निलेश सागर आणि निखिल ओसवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

 

0000

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वेक्षणाचा नवा विक्रम..

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

बांद्राच्या एमआयजी मध्ये अवाच्या चालण्याच्या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

vishwatmaklokswamivarta

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्याव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे..