vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न; नियोजित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न; नियोजित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

बुलढाणा, द प्रतिनिधी): जिल्ह्यात आगामी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून *मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक* पार पडली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सर्व यंत्रणांच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेऊन, आराखड्यातील तरतुदींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. मान्सून काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि विविध विभागांचे जिल्हा प्रमुख दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते.बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देताना जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले की, १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत. प्रत्येक विभागाने आपापले आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करून स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बचाव साहित्य जसे की बोटी, लाईफ जॅकेट व इतर साधनसामग्री सुस्थितीत असल्याची खात्री करून तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपलब्ध होऊ शकतील असे पोकलेन, जेसीबी, जनरेटर यांसारखी यंत्रसामग्री पुरवणारे कंत्राटदार आणि मोठ्या प्रमाणावर किराणा माल सप्लाय करणारे दुकानदार यांची यादी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पूरस्थितीमध्ये नदीकाठी किंवा पुलावर जाऊन स्टंटबाजी करणाऱ्या आणि सेल्फी काढणाऱ्या मंडळींमुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. अशा स्टंटबाजांवर कडक आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी पोलीस व स्थानिक प्रशासनाला दिल्या. पूर आल्यामुळे मार्ग बंद झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांची माहिती देणारी व्यवस्था कार्यान्वित करावी. या सर्व कामांमध्ये स्थानिक नागरिक आणि गावकऱ्यांची मदत घेऊन लोकसहभागातून आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पूरग्रस्त आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये सतर्कता वाढवण्यासाठी तहसील स्तरावर २० मेपूर्वी सूक्ष्म आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये मे महिन्यातच अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुरवठा विभागाला देण्यात आले असून, आरोग्य विभागाने सर्पदंश व साथरोगावरील औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. धरण क्षेत्रातील गावांना पाण्याच्या विसर्गाबाबत आगाऊ सूचना देण्यासाठी दवंडी व पोलीस यंत्रणेचा प्रभावी वापर करावा, असेही बैठकीत सांगण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासनातील प्रत्येक घटकाने आपल्या जबाबदारीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी बैठकीच्या समारोपप्रसंगी केले.

00000

संबंधित पोस्ट

कुंभमेळा पर्वणी काळात येणारे भाविक व वाहतूकीचे सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

vishwatmaklokswamivarta

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने विकास कामे करावीत- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन• *नागरिकांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाशी संबंधीत पोस्ट करण्याचे आवाहन*• *शालेय विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta