vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने समन्वयाने काम करा- प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी

पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने समन्वयाने काम करा- प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी

पुणे प्रतिनिधी-आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्ह्यांनी पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले. हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेल्या अल निनोच्या प्रभावामुळे संभाव्य टंचाई उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विधानभवनात आयोजित मान्सूनपूर्व तयारीबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्रीमती द्विवेदी बोलत होत्या. या बैठकीस सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्हाधिकारी, विभागातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांचे अधिकारी, जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी, पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, मान्सून काळात मोठ्या पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात. नालेसफाईची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दरडप्रवण भागातील नागरिकांना आवश्यकता असेल तेव्हा सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्याचे नियोजन तयार ठेवावे. पूरस्थितीमुळे नदीकाठ तसेच नाल्यांच्या कडेच्या कुटुंबांना सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यासाठी निश्चित केलेल्या जागी त्या- त्या वेळी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे, असेही त्या म्हणाल्या.

पावसाळ्यात सर्व जिल्ह्यात व महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा हद्दीत पुरेसा औषध व लसींचा साठा ठेवण्यात यावा. दूषित पिण्याच्या पाण्यातून आजार पसरू नयेत यासाठी पाणी नमुने घेऊन नियमित तपासणी व्हावी तसेच पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन व अन्य उपाययोजना कराव्यात. जलजन्य आजारांच्या साथी पसरू नयेत यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सुसज्ज असल्याचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यांमध्ये आपत्तीमध्ये प्रशासनाला मदत व्हावी यासाठी आपत्ती मित्रांची नेमणूक व त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींना जीवरक्षक जॅकेट, बॅटऱ्या, दोरखंड, आवश्यक तेथे बोटी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पूर्व उपाययोजना म्हणून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाशी आलमट्टी धरण पूरनियंत्रण समन्वयाबाबत झालेल्या बैठकीची व पुढील काळातील नियोजनाची माहिती सादर करण्यात आली.बैठकीत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना आगामी हवामान अंदाज, अल निनोचा प्रभाव तसेच उष्णतेची लाट आदी अनुषंगाने सादरीकरण केले.

बैठकीत पूरनियंत्रण, आरोग्य विभागाची तयारी, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन नियोजन, वीजपुरवठा सुरळीत राखणे आदींचा आढावा घेण्यात आला. महावितरणच्यावतीने वीजपुरवठा सुरळीत राखण्याच्यादृष्‍टीने करण्यात आलेले नियोजन, पशुसंवर्धन विभाग आदींच्या नियोजनाचाही आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.

0000

संबंधित पोस्ट

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालयांनी तक्रार निवारण समितीची नोंदणी केंद्र शासनाच्या SHE BOX PORTAL करणे बंधनकारक

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा 

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक 

सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..

vishwatmaklokswamivarta

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*