अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !
अहिल्यानगर, द प्रतिनिधी: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेला अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेग आला असून आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना- २०२७ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक प्रगणकाला ३० दिवसांचा कालावधी आणि निश्चित प्रभागनिहाय घरांची जबाबदारी देण्यात आलेली असताना, काही कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
प्रभाग समिती क्रमांक ०२, शहर विभागातील जनगणना २०२७ चे पर्यवेक्षक अनिल सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले प्रगणक अरुण मारुती पवार व सौ. श्रद्धा सुभाष कुलकर्णी यांनी आपल्या वाट्याला आलेले जनगणनेचे काम तब्बल १०० टक्के पूर्ण करून एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे.विशेष म्हणजे, कडक उन्हाळा, वेळेचे बंधन आणि तांत्रिक प्रक्रियेची आव्हाने असतानाही त्यांनी अत्यंत कमी कालावधीत नकाशा तयार करणे, घरांना क्रमांक देणे आणि HLO ॲपच्या साहाय्याने घरगणना प्रक्रिया वेगाने आणि अचूकपणे पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरीने जनगणना मोहिमेत नवा मापदंड निर्माण केला असल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे.
या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर तसेच सहायक आयुक्त मेहेर लहारे यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करत इतर प्रगणकांसाठीही हा आदर्श असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.प्रभारी अधिकारी अजीम शेख यांचे मार्गदर्शन या गटाला लाभले. कडक उन्हात रस्त्यावर फिरत, प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आणि वेळेची शर्यत जिंकत पूर्ण झालेली ही मोहीम आता इतर प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी प्रेरणेचा विषय ठरत आहे. “नियोजन, मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असेल तर कोणतेही लक्ष्य अशक्य नसते,” हे या कामगिरीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अहिल्यानगरच्या जनगणना मोहिमेत आता या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांच्या मते हे केवळ काम पूर्ण होणे नसून कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि सांघिक कार्याचा आदर्श नमुना आहे.