
शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन
राज्य प्रतिनिधी
येत्या खरीप हंगाम २०२६ मध्ये कृषी विभागाच्या विविध निविष्ठा व लाभाच्या योजनांपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप फार्मर आयडी न काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी (पी.एम. किसान व वनपट्टाधारक शेतकरी सहित) तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा संबंधित यंत्रणेमार्फत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात केली जात आहे. राज्यातील अंदाजे १७१ लाख खातेदार शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येणार असून विशेषतः राज्यातील ११९ लाख पीएम किसान लाभार्थी शेतक-यांना ओळखपत्र प्रदान करून या योजनेअंतर्गत सामावून घेण्याचे उदिष्ट आहे.
राज्यात कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण करण्यात येत असून त्याद्वारे विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.



