vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

राज्यात सन 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू खरीप हंगाम 2026 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

ठाणे, प्रतिनिधी  : राज्यात सन 2026- 27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना शासन निर्णय दि.3 जुलै, 2026 अन्वये लागू करण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात चालू वर्षीचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे.

भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या 14 पिकांसाठी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजने सहभागी होता येणार आहे.

शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के विमा हप्ता भरून सहभाग घ्यावा लागेल. कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के राहील.

विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दि.31 जुलै, 2026 आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टल https://pmfby.gov.in यावर ऑनलाईन सहभाग नोंदवता येईल. भाग घेण्यासाठी बँक, सामूहिक सुविधा केंद्र (CSC), किंवा स्वतः शेतकरी ऑनलाइन अर्ज भरून भाग घेऊ शकतात.

 

योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक आहे. जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंटसाठी आधार क्रमांक बँक खात्यास जोडलेला असावा.

 

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत करणे बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्वे मधील पीक व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्वेमध्ये नोंदविण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. तसेच, यात तफावत असल्यास विमा अर्ज रद्द होईल.

योजनेत चुकीच्या मार्गाने अर्ज करून गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पुढील पाच वर्ष कृषी विषयक योजनांपासून वंचित रहावे लागेल.

योजनेत भाग घेण्यासाठी किमान 0.10 हेक्टर पिकाखालील क्षेत्र असणे आवश्यक आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी व्हावे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभाग घेण्यास इच्छूक नसल्यास तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बॅकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु.60/- देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा हप्ता रकमेच्या व्यतिरिक्त जादा शुल्क देण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात काही अडचण आल्यास संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नजिकची बँक, किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून शेतकरी माहिती घेऊ शकतात.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा :   जिल्हा – अहिल्यानगर, नाशिक व चंद्रपूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर व रायगड, यवतमाळ, अमरावती व गडचिरोली. नियुक्त विमा कंपनी – इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

 

जिल्हा – सोलापूर, जळगाव व सातारा ली, हिंगोली, अकोला, धुळे व पुणे. नियुक्त विमा कंपनी – एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

जिल्हा – परभणी, वर्धा व नागपूर, जालना, गोंदिया व कोल्हापूर. नियुक्त विमा कंपनी – युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी लि.जिल्हा – वाशिम, बुलडाणा, सांगली व नंदुरबार. नियुक्त विमा कंपनी – बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

जिल्हा – धाराशिव. नियुक्त विमा कंपनी – भारतीय कृषि विमा कंपनी.

 

जिल्हा – लातूर, बीड. नियुक्त विमा कंपनी – एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

   या वर्षी हवामान खात्याने पावसाच्या संदर्भात दिलेली माहिती विचारात घेता शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणाच्या दृष्टीने पिक विमा योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकाचा विमा घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी आयक्तालय संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

0000

 

 

संबंधित पोस्ट

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरीकांच्‍या मदतीसाठी हेल्‍पलाईन

महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ**रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार*

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला राज्यशासनाच्यावतीने गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस