
उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…
मुंबई, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ
आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत अभियानाशी सुसंगत पद्धतीने ५० हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यात आले असून, त्याचा सुमारे ३.२ लाख नागरिकांना थेट लाभ झाला आहे. अॅनिमिया मुक्त भारत अभियानाअंतर्गत महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय ओळखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सुमारे ५ हजार उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना विशेष उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर एक हजारांहून अधिक पाच वर्षांखालील बालकांना प्रगत उपचारासाठी पाठविण्यात आले.
याशिवाय, २२६ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांची घरपोच आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यात आली. आरोग्य जनजागृतीसाठी विविध विशेष आरोग्य शिबिरे तसेच जागतिक आरोग्य, क्षयरोग, मातृत्व आणि योग दिन साजरा करण्यात आला.ग्रामीण क्रीडा विकासाला नवी दिशा ‘खेलो इंडिया’ अभियानाशी सुसंगत ‘शुभ आरंभ स्पोर्ट्स फॉर एक्सलन्स’ या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात आले आहे. फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक, जीवनकौशल्य प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दशकात सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये मुलींचा सहभाग जवळपास ५० टक्के आहे. परिसरात १० क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे
शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा उपक्रम
ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. २७ आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, १२ स्वच्छतागृहे अनेक शाळांमध्ये संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉक आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ६० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात दरवर्षी मोठी बचत होत आहे. तसेच विविध वाड्यांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे.
जलसंधारणातून शेतीला दिलासा जलसंधारण क्षेत्रात सहा जलसाठा संरचनांची निर्मिती व दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे २,००० लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ ३०० एकरांहून अधिक शेती आणि ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.



