
महिला शेतकरी गटांना अवजार बँकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, प्रतिनिधी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत गावस्तरावर ‘कृषी अवजारे बँक स्थापन करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावांतील महिला शेतकरी गटांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे आहे.
अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या उच्च किमतीमुळे उद्भवणाऱ्या समस्सेवर मात करण्यासाठी व यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कृषी उर्जेचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांतर्गत प्रकल्प गावातील महिला शेतकरी गटाना कृषी यांत्रिकीकरणासाठी कृषी औजारे बँकेद्वारे आवश्यक कृषी औजारे उपलब्ध करून देण्यात येतात. याचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र महिला शेतकरी गटांनाही अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रकल्प गावातील एमएसआरएलएस किंवा माविम पुरस्कृत महिला बचतगट व गाव संघ अर्ज करण्यास पात्र राहतील. अर्जदार गटात वेगवेगळया कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेचा लाभ घेतलेले गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास निवड प्रक्रिया ऑनलाइन लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे कृषी अवजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के अर्थात कमला 24 लाखांच्या अनुदानाची तरतूद आहे. प्रकल्प मूल्य 20 लाखांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयकृत बँकेकडून प्रकल्प मुल्याच्या 75 टक्के कर्ज घेणे बंधण कारक आहे. निवड झालेल्या गटांना गावस्तरावर कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी औजारे व यंत्र निवडण्याची मुभा आहे. प्रकल्प क्षेत्रातील पात्र महिला गटांनी या योजनेच्या लाभासाठी dbtndksp.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.
००००००



