उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून गुणगौरव,ग्रामविकासातील उल्लेखनीय योगदानाची दखल; प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन गौरव
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून गुणगौरव,ग्रामविकासातील उल्लेखनीय योगदानाची दखल; प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन गौरव
ठाणे प्रतिनिधी) : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासात्मक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रामस्थांच्या गरजा, स्थानिक समस्या आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांचा विचार करून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत, जिल्हा परिषद, ठाणेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला.
उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा), आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भूषविले. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. शासनाच्या विविध योजना आणि लोककल्याणकारी उपक्रमांचा लाभ तळागाळातील गावांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रामपंचायत अधिकारी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आजचा गुणगौरव सोहळा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी सन्मानित ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामविकास अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या विकासाचा कणा असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रत्यक्ष गावपातळीवर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी सन्मानित झालेल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले
गावांच्या विकासासाठी प्रशासनाच्या विविध स्तरांमध्ये समन्वय ठेवून काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार किसन कथोरे यांनी सभागृहाला संबोधित करताना गावपातळीवर विकासाची कामे पुढे नेण्यात ग्रामपंचायत अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. ग्रामविकासाची कामे करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी आपण अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले.ग्रामविकासाची विविध कामे अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही देतानाच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी सभागृहाला संबोधित करताना ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे, सुरक्षित आणि सन्मानाने राहता येईल असे घर मिळवून देण्यासाठी घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात घरकुल योजनेचे कामकाज उत्कृष्टपणे राबविताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि घरकुलांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज करण्यात आलेला गौरव ही त्यांच्या मेहनतीला मिळालेली कौतुकाची थाप आहे. यापुढेही याच उत्साहाने, संवेदनशीलतेने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनातून काम करत शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा आणि अधिकाधिक पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी गुणगौरव सोहळ्याच्या आयोजनापासून ते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले. या गौरवामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली जातेच, त्याचबरोबर इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही अधिक जबाबदारीने, संवेदनशीलतेने आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशनयावेळी ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान – ग्रामीण, जिल्हा ठाणे’ संदर्भातील घडीपत्रिका व पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील रोजगार, उपजीविका आणि विकासाच्या विविध संधींबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने या प्रकाशनाला महत्त्व आहे.
सन्मानित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मनोगतसत्कारमूर्ती ग्रामपंचायत अधिकारी नितीन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गुणगौरव सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आल्याने ही आपल्या कामाची ‘कौतुकाची थाप’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित कुटुंबीय तसेच सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, कार्यकारी अभियंता दीपली घोरपडे, विकसित भारत – जी राम जी गट विकास अधिकारी प्राची साळसकर, कृषी अधिकारी सुवर्णा माळी तसेच जिल्हा परिषद, ठाणेच्या ग्रामपंचायत विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तरुलता धनके यांनी उत्कृष्टरीत्या केले.‘सक्षम ग्रामपंचायत – विकसित गाव – समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र’ या दिशेने वाटचाल करताना ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपातळीवरील यंत्रणेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा करण्यात आलेला हा गुणगौरव ग्रामीण विकासाच्या कार्याला प्रोत्साहन देणारा तसेच इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे