प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट,आरोग्य सेवांचा आढावा; गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर, : प्राथमिक आरोग्य केंद्र, बाबरा येथे आज जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी आकस्मिक भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.पदाधिकाऱ्यांनी बाह्यरुग्ण विभागाची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधोपचार व सेवांबाबत रुग्णांकडून माहिती घेतली. आरोग्य केंद्राचे बाह्यरुग्ण सेवेचे निर्धारित उद्दिष्ट १ हजार ८०० असताना आतापर्यंत २ हजार ४०० रुग्णांना सेवा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा तसेच संबंधित नोंदींचा आढावा घेण्यात आला. आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती समाजमाध्यमांद्वारे नियमितपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पोषण माह, किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम, सॅम व मॅम बालकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य व पोषण सेवा, आयुष्मान कार्ड वितरण तसेच लसीकरणाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदींसोबत ऑफलाइन नोंदीही अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी व शाळांमधील बालकांची आरोग्य तपासणी १०० टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी आरोग्य केंद्रातील विविध विभाग, नोंदवह्या व अभिलेखांची पाहणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण उगले यांच्यासह आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.