vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार – मंत्री प्रकाश आबिटकर टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार – मंत्री प्रकाश आबिटकर टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स…

मुंबई, प्रतिनिधी : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, समुपदेशन आणि उपचार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टेली-मानस हेल्पलाइन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (१० ऑक्टोबर) राज्यात ‘मनजागृती’ आणि ‘मनसंवाद’ या संदेशांतून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यंदाची जागतिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून त्यातून सकारात्मक बदल घडविण्याची आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना केवळ ऐकून घेणे पुरेसे नसून, त्यांच्या अनुभवांना सेवा आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे.

टेली-मानसला तीन लाखांहून अधिक कॉल्समानसिक ताण, चिंता, नैराश्य तसेच अन्य मानसिक आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी टेली-मानस ही २४ तास उपलब्ध असलेली राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू आहे. राज्यात २०२२-२३ पासून एप्रिल २०२६ पर्यंत या सेवेला तीन लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. मानसिक आरोग्यविषयक मदतीसाठी नागरिकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधता येत असल्याने या सेवेचे महत्त्व वाढले आहे. टेली-मानस हेल्पलाइन क्रमांक १४४१६ असा आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतूनही उपचार,मानसिक आरोग्यविषयक सेवा नागरिकांच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर मनशक्ती क्लिनिकच्या माध्यमातून सेवा देण्यावर भर दिला जात आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांची वेळीच ओळख, समुपदेशन, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय सेवांसाठी संदर्भ देणे, यामुळे रुग्णांना मदत मिळू शकते. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्समावेशन यांसाठीही प्रयत्न केले जात आहेत.

स्मृतीदोष क्लिनिकचा हजारो ज्येष्ठांना आधार,वाढत्या वयात जाणवणाऱ्या स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांचे निदान आणि उपचार करण्यासाठी स्मृतीदोष क्लिनिकच्या माध्यमातून विशेष बाह्यरुग्ण सेवा दिल्या जात आहेत. या क्लिनिकमध्ये दरवर्षी सुमारे ४५ हजारांहून अधिक नागरिक लाभ घेत असल्याची माहिती आहे. स्मृतीदोष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यात या सेवांची भूमिका महत्त्वाची आहे

स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग-मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनासोबत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही घेतला जात आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एकलव्य फाउंडेशन आणि श्रद्धा फाउंडेशन यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने जनजागृती, समुपदेशन आणि समुदायस्तरावरील मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शासन, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांच्या समन्वयातून मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचे उद्दिष्ट आहे.

कलंक दूर करण्यासाठी ‘मनसंवाद’मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत समाजात असलेले गैरसमज आणि कलंक दूर करणे ही काळाची गरज आहे. ‘मनजागृती’ या संदेशातून प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकण्याचे, तर ‘मनसंवाद — बोलूया, ऐकूया, समजून घेऊया’ या उपक्रमातून मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मानसिक आरोग्य सेवा अधिनियम, २०१७ नुसार मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचे अधिकार, सन्मान आणि गोपनीयता जपणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी मदत घेणे आणि गरजू व्यक्तींना आधार देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

००००

 

संबंधित पोस्ट

गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत संवेदनशीलता प्रभावी पोलीस व्यवस्थेचे सूत्र असावे – महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘शक्ती व सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला .पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. 

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे