
मोफत कायदेशीर विषयक मार्गदर्शनासह शासकीय योजनांचा गरजू नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे – न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे-लातूर येथे महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा
लातूर, प्रतिनिधी : शासकीय लोककल्याणकारी योजनांपासून समाजातील कोणताही पात्र आणि गरजू घटक वंचित राहू नये, यासाठी न्यायव्यवस्था आणि प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे. अशा घटकांपर्यंत कायदेविषयक माहिती आणि शासकीय योजना पोहोचविणे आवश्यक असून यासाठी विधी सेवा समितीमार्फत महा विधी सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे यांनी सांगितले. लातूर येथील दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने या महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाजलार्पण अर्थात रोपट्याला पाणी अर्पण करून अनोख्या पद्धतीने करण्यात आला. या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर आणि जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार जाधव यांच्यासह न्यायिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने प्रमुख उपस्थिती होती.
सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. या योजनांपासून एकही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी विधी सेवा समितीच्यावतीने शासकीय योजनांचा महामेळावा घेवून योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहचण्यास मदत होईल. विधी सेवा समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला व मदतीसोबतच शासकीय योजनांचा लाभ थेट लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे न्यायमूर्ती श्री. मोरे सांगितले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात न्यायपालिका आणि प्रशासनावर विशेष जबाबदारी येते. अशा काळात सर्वांनी संवेदनशीलपणे काम करून नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे. नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासोबतच अशा शिबिरांच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना थेट गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रसार करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी यावेळी सांगितले.
तळागाळातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणची सुरुवात झाली. विविध उपक्रम राबवून अशा लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शिबिराच्या माध्यमातून न्याय व्यवस्था, प्रशासन आणि विविध शासकीय विभाग एकाच छताखाली येवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. न्यायाची माहिती, न्यायाची संधी प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हाच या शिबिराचा उद्देश असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले.



