रिकामी धावणारी ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्या-खासदार नरेश म्हस्के यांची विभागीय रेल्वे व्यवस्थपकांकडे मागणी
रिकामी धावणारी ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्या-खासदार नरेश म्हस्के यांची विभागीय रेल्वे व्यवस्थपकांकडे मागणी
ठाणे – प्रतिनिधी –
मध्य रेल्वेवरील परळ ते कल्याणदरम्यान धावणाऱ्या ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकलमधील उपलब्ध क्षमतेचा वापर सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात यावा, अशी मागणी नरेश गणपत म्हस्के यांनी केली आहे. ही लोकल दैनंदिन प्रवासात मोठ्या प्रमाणावर अंशतः रिकामी धावत असल्याचे निदर्शनास आणून देत, तिचे काही डबे सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मध्य रेल्वेतर्फे दररोज दुपारी सुमारे ४.०५ वाजता परळ स्थानकातून कल्याणच्या दिशेने ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल चालवली जाते. ही गाडी प्रामुख्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राखीव असते. मात्र, या गाडीतील उपलब्ध जागांचा पुरेपूर वापर होत नसल्याने गर्दीच्या वेळी सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तिचा उपयोग करता येऊ शकतो, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
सिग्नल बिघाडाच्या वेळी प्रवाशांची गैरसोय२६ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल धावत असताना, दरवाजे व खिडक्या बंद ठेवल्यामुळे स्थानकांवर ताटकळत उभ्या असलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळू शकला नाही, असा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन,रेल्वे ही मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सहकार्य करणे आणि उपलब्ध रेल्वे सुविधांचा जनहितासाठी प्रभावी वापर करणे आवश्यक आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांशी सुसंवाद राखण्याबाबत आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य सहकार्य करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या लोकलमधील उपलब्ध जागा किंवा काही डबे सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध केल्यास गर्दीच्या वेळेत प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळू शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व आदेश द्यावेत, अशी विनंती खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी केली आहे.