
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची : बुलेट ट्रेनचे बीकेसीतील काम लांबणीवर…
मुंबई प्रतिनिधी : नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करत आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील स्थानकाच्या जागेसह बांधकाम करण्यातील अडथळे अद्याप दूर होत नसल्याने बुलेट ट्रेन धावण्यास विलंब होणार आहे.
त्यामुळे मुंबई टर्मिनसचे काम २०२२ अखेर सुरु होणे अवघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्न प्रकल्प असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. राज्यातही जमीन संपादनाला सहकार्य होऊ लागण्याने या प्रकल्पाला काहीशी गती मिळाली आहे. बुलेट ट्रेनचे वांद्रे कुर्ला संकुलातील स्थानक असलेल्या मुंबई टर्मिनसच्या बांधकामाला एनएचएसआरसीएलमार्फत २०२२ अखेर सुरुवात करण्यात येणार होती. मात्र बीकेसीतील जमीन हस्तांतरण करार आणि इतर अनेक कामे प्रलंबित असल्याने एनएचएसआरसीएलला हे काम वेळेत सुरु करण्यात अडचण येऊ लागली आहे.मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प ९९ हजार कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या जायकातर्फे ७९ हजार कोटी रुपये ५० वर्षांच्या दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांना पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा दोन-तृतीयांश भाग गुजरातेत असूनही महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र समान खर्च येणार असल्याने याला विरोधही होत होता.
वांद्रे कुर्ला संकुलात २०२२ च्या अखेरीस स्टेशनचे बांधकाम सुरू करण्याची योजना एनएचएसआरसीएलने आखली होती. संकुलात प्रस्तावित स्थानक तीन मजली भूमिगत असणार आहे. स्थानकाच्या सर्वात खालच्या मजल्यावर गाड्यांसाठी सहा प्लॅटफॉर्म असतील. बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (बीपीसीएल) पर्यायी दिलेल्या जमिनीवर अद्याप कंपनीने स्थलांतर केलेले नाही. तसेच जागा हस्तांतरित करणे आणि पर्यायी जागेसाठी भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी करणे बाकी असल्याने अद्याप एनएचएसआरसीएलला येथे काम करण्यास अजून वेळ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.



