
विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम
माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा..
मंत्रालय प्रतिनिधि :विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काम कमी आणि गदारोळानं जास्त गाजतंय. कालचा दिवस तर नितेश राणे, सुहास कांदे, भास्कर जाधव, फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजलं. पण त्याच वेळेस विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम. विशेष म्हणजे दोघांनाही भाई म्हटलं जातं. रामदास कदमांनी निरोपाचं भाषण मात्र आटोपशीर केलं. अवघ्या सात मिनिटात त्यांचं भाषण संपलं पण हेच सात मिनिटांचं भाषण चर्चेत राहिलं. त्याला कारण आहे ते रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
नेमकं काय म्हणाले रामदास कदम?
रामदास कदम यांनी अडीच वर्षापूर्वीच राजकारणातून रिटायरमेंट जाहीर केलीय. पण तरीही विधान परिषदेसाठी ते उत्सूक असल्याची चर्चा कायम रंगली. त्यातच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासोबत त्यांचा झगडा सुरु झाला. तो शेवटी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढण्यापर्यंत पोहोचला. रामदास कदम ज्यावेळेस निरोपाचं भाषण करायला उभे राहीले त्यावेळेही त्यावर त्या वादाची छाया स्पष्ट जाणवत होती. पण कदमांनी यावेळी वादावर न बोलता, माझ्यानंतर उद्धवला साथ द्या, बाळासाहेबांच्या ह्या वक्तव्यावर भर दिला. एवढच नाही तर कदम म्हणाले की, बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होतील अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. ते म्हणाले- पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, मराठा माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्यासह माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्या घोषवाक्याकडे आकर्षीत होऊन मी 1970 साली शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. त्याला आता 52 वर्षे होतायत. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, नामदार, मी स्वत:ला भाग्यवान समजतो सभापती महोदय, अनेक वर्षे 40-45 वर्ष मला शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली.



