
डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये विवाद..
डोंबिवली मध्ये दोन गटांचा विवाद एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसैनिक
डोंबिवली प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना आता स्थानिक पातळीवरही पाहायला मिळतो आहे. दोन्ही गटातील संघर्ष आज (2 ऑगस्ट) डोंबिवलीमध्ये पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली येथील मध्यवर्थी शिवसेना शाखेत अचानक प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी या शाखेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिमा लावण्याचा प्रयत्न केला. याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिकार झाला. यावेळी दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. यात दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान, शिंदे समर्थकांनी सोबत आणलेल्या प्रतिमा भींतीवर लावल्याचे समजते.
ठाणे हा एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, आता एकनाथ शिंदे हे स्वत:च शिवसेनेतून वेगळे झाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांचा गटच शिवसेना आहे. शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट परस्परांविरोधात न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या याचिकांवर उद्या (3 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाचा निकाल काय येतो याबाबत उत्सुकता आहेच. तोवर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भीडत आहेत.
डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांना मानणारे कट्टर शिवसैनिक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष आहे. दोन्ही बाजूंनी नोंदणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परिणामी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवरील ताण वाढला आहे



