
llकुटुंब व्यवस्थापनll
आध्यात्मिक वार्ता
या विषयावरील चिंतन यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुटुंबातील सदस्यांना न ओळखु शकणारी माणसं जगाला काय ओळखणार?माझं निरीक्षण हे सांगतं की बरीचशी माणसं प्रपंचात अपयशी झाल्याने, मोठी संकटं आल्यानं अध्यात्मिक झाल्याचं सोंग करतात. समस्या नाही असा परिवार सापडणं कठीण आहे. चांगलं वागुनही समस्या येतात,दोष लागतात हा माझा अनुभव आहे.पण आपण पवित्र असु तर त्याची फार चिंता कयण्याचं कारण नाही. सतसद्विवेकाने मार्ग काढता येतो.पण काहीतरी चमत्कार होईल,मग मला आनंदी जीवन जगता येईल या भाबड्या आशेवर जगण्यात काहीच अर्थ नाही.शिवाय वयाचं काय?अर्धंअधिक निघून गेलेलं असतं,किती श्वास शिल्लक आहेत माहित नाही.
तेवढा वेळ आहे का मला सुधारायला?
माहीत नाही.
“कुटुंबव्यवस्था”हेच मोठं अध्यात्म आहे हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल.
आईवडीलांना, मुलांना,पत्नीला न समजू शकणारा कितीही मोठा राजकारणी असेल,उद्योगपती असेल,महंत असेल,जीवनाचा अंतिम प्रवास खूप दुःख्ख देणारा असेल. हे नाकारलं तरी चुकणार निश्चित नाही. प्रपंचाला चुकवून अध्यात्मिक झालेली माणसं ओळखताही लगेच येतात. तुम्ही म्हणाल कसं?
अशी माणसं अध्यात्मात नेहमी एकटेच दिसतील, कुटुंबाशिवाय. यांच्या अध्यात्माशी कुटुंबाला काहीच देणंघेणं नसतं.
अशाच एका एकट्यानं अध्यात्म करणाऱ्या व्यक्तीच्या घरी चहापाणासाठी जाण्याचा योग आला.चहा पिऊन होतोयना कुठे,त्यांची बायको मला म्हणाली,”महाराज, यांना जरा चार गोष्टी चांगल्या सांगा.पॉरांकडं जरा लक्ष द्यायला सांगा.धडाधड माघं बोलात्यात पॉरं.हा माणुस रोज रात्री उशिरापर्यंत बाहेर असतोय.बरं बोलायची पण सोय नाय.म्हणतील ही बया देवदेव करायला आडवी येती.”काय बोलणार मी?…..😊
☺ देवाला प्रसन्न करणं सोपं आहे.
पण घरातील जागृत देवस्थान म्हणजे कुटुंब आहे.या देवांची पुजा बांधण्यात जो यशस्वी होईल, तो खरा अध्यात्मिक.
सेवेच्या संधी कळणं म्हणजे अध्यात्म. अध्यात्मावर नुसतं छान छान बोलणं म्हणजे अध्यात्म नव्हे.
कुटुंबातील जेष्ठांची सेवाः
आजी,आजोबा,आईवडील कुटुंबातील इतर जेष्ठ व्यक्ती. यांची वयपरत्वे करावी लागणारी सेवा जर आपण करु शकलो नाही. तर आपण खऱ्या अर्थाने नास्तिक आहोत.
पुढच्या पिढीसाठी संस्कारः
मुलांनी काय करावं हे त्यांना सांगायची गरज नाही. आपलं आचरण त्यांच्यावर यथायोग्य संस्कार किंवा कुसंस्कार करत असतात.
फिनिक्सच्या माध्यमातून कौटुंबिक समुपदेशन करण्यात येते. अनेक परिवारातील समस्या सोडवण्यात फिनिक्सला यश आले आहे. अशी पारिवारिक माहिती संपूर्णतः गोपनीय असते.
कुटुंबात आनंद निर्माण करण्यात यश येणं हे देवाला प्रसन्न करण्याइतकच सात्त्विक कार्य आहे.
स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ।
मिळावया मनुष्य जन्म एकवेळ।।
#देवांनीही_हेवा_करावा_इतका_श्रेष्ठ_मनुष्य #जन्म_दुसऱ्याची_उणीदुणी_काढण्यात_का_घालवावा ?
चला आपण सर्वच यावर विचार करुया. एखाद्या कुटुंबातील डोळ्यांनी दिसणारी वाताहत पुढे होऊन थांबवूया.(नातेवाईक संबंधात हा प्रयत्न सर्व बाजुंचा विचार करुनच करावा.आपला प्रयत्न प्रामाणिक असला तरी भाऊबंदकी,सगेसोयरे संबंध आडवे येऊन समस्या मिटण्याऐवजी वाढु शकतात. अशा वेळी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.)त्या परिवारातील आनंद अशिर्वादाला कारण ठरेल. आणि आम्ही खरे अध्यात्मिक झाल्याचा आनंद मिळेल.
युवकांनो तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे.
जय जय राम कृष्ण हरी



