
कर्नाटक निवडणुका :लोकशाही प्रक्रियेने होणार मुख्यमंत्र्यांची निवड’ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या
कर्नाटक प्रतिनिधी
कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी नाही तर आमदार घेतील, असे विधान मी केलेच नाही,’ असा पवित्रा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी घेतला. मुख्यमंत्र्यांची निवड ही लोकशाही प्रक्रिया आहे, असे मी म्हणालो होतो, असा खुलासाही त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला आहे, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ‘‘प्रसारमाध्यमांनी यासंबंधी जे वृत्त दिले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांची निवड ही लोकशाही प्रक्रिया आहे. मुख्यमंत्रिपदासाठी मी इच्छुक आहे आणि तेही (डी.के.शिवकुमार) इच्छुक आहे’ असे मी म्हणालो होतो. पण माध्यमे जे म्हणत आहेत, ते खोटे आहे, असा खुलासा सिद्धरामय्या यांनी केला.
सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये बेबनाव असल्याचा अंदाजही माध्यमांमध्ये व्यक्त होऊ लागला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्र्याबद्दलचे वक्तव्य केले होते. ‘जर कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर आली तर मुख्यमंत्री निवडण्यात पक्षश्रेष्ठी हस्तक्षेप करणार नाहीत तर निवडून आलेले आमदार ही निवड करतील,’ असा दावा त्यांनी केला होता. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.दोन्ही नेते प्रबळ दावेदारकाँग्रेस कर्नाटकात सत्तेवर आली तर मुख्यमंत्री बनण्याची मनीषा दोघांनीही कायम खुलेपणाने व्यक्त केली आहे, मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या दोघांना एकजुटीने लढण्याची सूचना वारंवार केली असून कर्नाटकात पक्षाची सत्ता आल्यास मुख्यमंत्र्यांची निवड पक्षश्रेष्ठी करतील, असेही स्पष्ट केलेले आहे.



