
मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई सहसचिवपदी विशाल परदेशी…
मुंबई, प्रतिनिधी :मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई सहसचिव पदी न्यूज 18 लोकमत चे अँकर विशाल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेच्या मुंबईतील बैठकीत मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी ही घोषणा बुधवारी केली. विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, मुंबई विभागिय सचिव दिपक कैतके हे यावेळी उपस्थित होते.
मुंबई कार्यकारिणीला नियुक्ती पत्रे प्रदान
यावेळी नवनियुक्त मुंबई कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांना पुनर्ननियुक्ती पत्र देण्यात आले. कार्याध्यक्ष संजय मिस्किन, उपाध्यक्ष विनायक सानप, सचिव दीपक पवार आणि कोषाध्यक्ष पांडुरंग म्हस्के यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आली.
मुंबईत संघटना वाढवा
मुंबईत परिषदेच्या कामाचा विस्तार मुंबई एमएमआर विभागात करावा तसेच परिषदेच्या नावाला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन एस. एम. देशमुख यांनी यावेळी केले. परिषदेला 84 वर्षांची उज्वल परंपरा लाभली असून अनेक दिग्गजांनी संघटनेचे नेतृत्व केले आहे, ही परंपरा अशीच वृद्धिंगत करावी, असे देशमुख यावेळी म्हणाले. पत्रकारांच्या मुलभूत हक्कांसाठी आपण लढत आहोत, ही संघटनेची ओळख कायम ठेवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लवकरच मुंबईत मान्यवरांचा गौरव सोहळा
परिषदेच्या वतीने दिलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांची निवड यादी यावेळी पूर्ण करण्यात आली असून मुंबई होणाऱ्या भव्य दिव्य सोहळ्यात त्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी यावेळी बैठकीत सांगितले. पुरस्कारांच्या नावांची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे, असे देशमुख यावेळी म्हणाले.



