
आदिवासी युवक-युवतींनी अल्प व्याजदराने,कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे शबरी महामंडळाचे आवाहन..
ठाणे प्रतिनिधी : आदिवासी समाजातील युवक-युवतींना तसेच बचतगटांना स्वयंरोजगारासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अल्प व्याजदराने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आर्थिक व विकास महामंडळाच्या (एन.एस.टी. एफ.डी.सी.) योजनांमधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनांमधून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या युवकांनी www.mahashabari.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज भरावे, असे आवाहन महामंडळाच्या जव्हार शाखा व्यवस्थापक राजेश पवार यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या एन.एस.टी. एफ.डी.सी.मार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांद्वारे तरुणांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी राज्य शासनाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने सन २०२३-२०२४ या वर्षासाठी जव्हार कार्यालयास लक्षांक दिला आहे. त्यामध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या जव्हार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील स्वयंसहाय्यता बचतगट योजना (रु.5 लक्ष) लक्षांक – 19, प्रवासी वाहन व्यवसाय (रु. 10 लक्ष) लक्षांक – 07, मालवाहून वाहन (रु. 10 लक्ष) लक्षांक -07, ऑटो रिक्षा व्यवसाय (रु. 2.40लक्ष) लक्षांक – 08 असे एकूण 41 लक्षांक जव्हार कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठी देण्यात आले आहेत.
कर्ज योजनांसाठी पात्रता अटी :- 1) लाभार्थी अर्जदार आदिवासी समाजाचा असावा. 2) लाभार्थी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा रू.3,00,000/– इतकी आहे. 3) लाभार्थीची वयोमर्यादा सर्व योजनांसाठी 18 वर्ष तें 45 वर्ष या दरम्यान असावी. 4) महिला सशक्तीकरण योजनेसाठी लाभार्थ्याकडून कोणताही वैयक्तिक सहभाग मार्जीन मनी अपेक्षित नाही. तसेच जात प्रमाणपत्रा बाबत महिलेच्या पतिचे अथवा मुला मुलींचे जात प्रमाणपत्र देखील ग्राह्य आहे. 5) महिला सशक्तीकरण कर्जावर द.सा.द.शे.4% एवढ्या अल्प दराने सरळ व्याज आकारले जाते. 6) तहसिल किंवा उपविभागीय कार्यालय (प्रांत) यांचा जातीचा दाखला (फक्त आदिवासी). 7) शाळा सोडल्याचा दाखला (वय वर्ष 18 ते 45). 8) तहसिल कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण व शहरी भागासाठी रू.3,00,000/- इतके असावे.). 9) व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्वयंघोषणापत्र व नगरपालिका क्षेत्रासाठी दुकाने अधिनियमाखालील परवाना. 10) व्यवसाय प्रकल्प अहवाल संबंधित शाखा व्यवस्थापक यांनी स्वतः इच्छुक लाभार्थीना मार्गदर्शन करून संक्षिप्तरित्या तयार करून देणे. 11) व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्याचे कोटेशन. 12) रेशनकार्ड छायाप्रत. 13) आधारकार्ड. 14) पॅनकार्ड असल्यास त्याची छायाप्रत. 15) तीन पासपोर्ट साईज फोटो. 16) वाहन व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांचे प्रचलित कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे. 17) स्वतःचा हिस्सा म्हणून भरावी लागणारी 5% सहभाग रक्कम. 18) रक्कम रु.5.00 लक्ष पेक्षा अधिक कर्ज योजनेसाठी एक सक्षम जामीनदार हवेत.
बचतगट /सहकारी संस्थासाठी आवश्यक कागदपत्रे :- 1) बचतगट / सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र. 2) बचतगट / सहकारी संस्थेचे सर्व सभासद यादी त्यांचे रेशनकार्ड व जातीचे दाखले. 3) बचतगट / सहकारी संस्थेचे कमीत कमी सहा महिन्यांचे बैंक खाते उतारा / स्टेटमेंट. 4) व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्वयंघोषणापत्र व नगरपालिका क्षेत्रासाठी दुकाने अधिनियमाखालील परवाना. 5) व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे कोटेशन.
या कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा सबसिडी मिळणार नाही. या योजनांसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahashabari.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. या योजनांसाठीचे प्रस्ताव नाशिक येथील मुख्य कार्यालयास देण्याची मुदत दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे. जास्तीत जास्त तरुणांसाठी या योजनांसाठी अर्ज करावे, असे आवाहन शाखा व्यवस्थापक राजेश पवार यांनी केले आहे.



