
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन…
ठाणे प्रतिनिधी:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे.
योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.
नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबाकांची उत्पादकता ही राज्याचा फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची बाब आहे. सन २०२३-2४ मध्ये राज्यमध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिकू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रु.४०,०००/- प्रति ग्राह्य धरून त्याच्या ५० टक्के प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु २० हजार प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी ०.२० हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीप्रमाणे राहील.
आंबा फळपिकाचे वय कमीत कमी – 20 वर्षे व जास्तीत-जास्त वय – 50 वर्षे, चिकू फळपिकाचे वय कमीत कमी – 25 वर्षे व जास्तीत-जास्त वय – 50 वर्षे, संत्रा फळपिकाचे वय कमीत कमी – 10 वर्षे व जास्तीत-जास्त वय – 25 वर्षे, मोसंबी फळपिकाचे वय कमीत कमी – 08 वर्षे व जास्तीत-जास्त वय – 25 वर्षे.,
तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलmahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे संचालक डॉ. के.पी.मोते यांनी कळविले आहे.



