
भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पुर्व प्रशिक्षणाचे आयोजन· 23 जानेवारीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखत
राज्य प्रतिनिधी :- भारतीय सैन्य दल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन डिफेन्स सर्विस या परिक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येणार आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जालना जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दि. 23 जानेवारी 2024 रोजी 12 वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयर पुणे सर्च करुन त्यामधील सीडीएस- 62 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेश पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे. सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार हा लोकसंघ आयोग नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस परिक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा. यापैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवुन यावेत. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आय. डी. – training.petenashik@gmail.com व दुरध्वनी क्र.0253 2451032 किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश पत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-



