
उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथमित्र पुरस्कारासाठी9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
राज्य प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2022-23 साठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेव आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातोल “अ” “ब” “क” व “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रूपये, 75 हजार रूपये, 50 हजार रूपये, 25 हजार रूपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते, असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.



