
मोबाईल सेवा पुरवठादारांनी निवडणुकीत दक्षता बाळगावी-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, प्रतिनिधी निवडणूक काळात निवडणुकीशी संबंधित बहुतांश कामे ऑनलाईन झाली आहेत. यासाठी अखंडीत इंटरनेट सेवा सुरू राहणे गरजेचे आहे, तसेच निवडणुकीतील उमेदवारांकडून बल्क एसएमएस पाठविण्यात येतात, याबाबत मोबाईल सेवा पुरवठादारांनी निवडणूक काळात दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोबाईल सेवा पुरवठादारांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी, निवडणूक कालावधीत बल्क एसएमएस मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येतात. यावर नियंत्रण करण्यात यावे. बल्क एसएमएस हे निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर पाठविता येत नसल्याचे सांगितले. तसेच फेक न्यूजवर आळा घालणे आवश्यक आहे. निवडणुकीत उमेदवारांचे सोशल मिडीयावर पेज असते. यावर प्रसारीत करण्यात येणारा मजकूर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच प्रचारासाठी बल्क एसएमएस जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक काळात लहान मुलांचा उपयोग, निवडणूक प्रक्रियेशी खोट्या बातम्यांबाबत सजग रहावे, असे सांगितले.
निवडणुकीशी संबंधित विविध कामे ऑनलाईन करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरणे, विविध ॲप, परवानगी आदींसाठी सुरळीत इंटरनेट असणे आवश्यक आहे. निवडणुकीतील नामांकन अर्ज दाखल करणे आणि मतमोजणी या दिवशी इंटरनेटची सुविधा सुरळीत राहण्यासाठी मोबाईल सेवा पुरवठादारांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
000000



