
जेएनयू’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारणीसाठी १० कोटी रुपये मंजूर
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार..
राज्य प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) “छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन” केंद्र उभारण्याकरता राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज़ादी का अमृतमहोत्सव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरित केला जाणार आहे
.हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे असून ते राज्य शासनातर्फे राज्यभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. याच निमित्ताने दिल्लीतील जेएनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करणारे अध्यासन उभारावे, अशी कल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मांडली. नवी दिल्ली येथे जेएनयूच्या कुलगुरू डॉ.शांतीश्री पंडित यांच्यासोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या झालेल्या बैठकीत या संकल्पनेला आकार देण्यात आला. त्यानुसार जेएनयूने छत्रपती शिवाजी महाराजांवर अध्यासन उभारण्याची पूर्वतयारी सुरू केली.
अध्यासनासाठी अभ्यासक्रम आखणे, विषय मांडणीसाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबीतील संशोधनासाठी राज्य शासन जेएनयू सोबत सहकार्य करणार आहे. या अध्यासनात (१) अंतर्गत सुरक्षा, (२) पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती, (३) गनिमी कावा (४) किल्ल्यांच्या तटबंदी संदर्भातील रणनीती, (५) मराठा इतिहास या विषयावर संशोधनात्मक कार्य होणार आहे. तसेच मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी) ची सुविधा तसेच मराठा साम्राजाची सैन्य व्यूहरचना, किल्ले व तटबंदी रचना यावरील अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार हे अध्यासन कार्य करणार आहे.



