
कोकण विभागात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
राज्य प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्ती मानवी घटनेविना घडणाऱ्या अशा घटना आहेत. ज्यांचा सर्व सजीवांवर नकारात्मक परिणाम होतो. नैसर्गिक आपत्तीची अनेक कारणे आहेत. निसर्गाच्या विरुध्द दिशेने वाटचाल केल्याने नैसर्गिक आपत्ती उद्भवते, जेव्हा ही कृती टोकापर्यंत पोहचते तेव्हा या घटनांना आपत्ती मानले जाते. हवामानासंबंधी नैसर्गिक आपत्तींमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, वन्य अग्नी, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि शीतलहरी यांचा समावेश आहे, नैसर्गिक आपत्ती या अनिश्चित असतात. नैसर्गिकआपत्ती ही एक अतिशय भयंकर आणि धोकादायक घटना आहे. जी अचानक घडते घरे, मालमत्ता, वस्तू आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान करुन जनजीवन विस्कळीत करते. मानवी चुकांमुळे, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण मानवाकडून पर्यावरणीय संसाधनांचा गैरवापर होतो आहे. यात कुणाचेही दुमत नाही.
कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि डोंगररांगांमुळे कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होते. त्यामुळे कोकणाला मोठया प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना ही करावा लागतो. कोकण विभागात एकूण 7 जिल्हे असून 50 तालुके आणि 6 हजार 353 गावे आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे सरासरी 2 हजार ते 3 हजार 368 मि.मी. पाऊस हा कोकणात पडतो. विशेषत: मुंबई व ठाणे जिल्ह्यात कमी कालावधीत जास्त पाऊस आणि भरतीची वेळ एकच असल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. कोकण विभागात गेल्या सहा वर्षात सरासरी 2 हजार 701.40 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 371 पूरप्रवण व 223 दरडग्रस्त गावे आहेत.
नैसर्गिक आपत्तीच्या घटनांचासामना कधीही नकळत करावा लागत असतो. यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि जनजागृती हे महत्त्वाचे उपाय आहेत. मानवनिर्मित आपत्ती ही मानवी चुका, निष्काळजीपणा आणि जाणूनबुजून केलेल्या चुकांमुळे उद्भवणारी आपत्ती आहे. मानवनिर्मित आपत्ती मानवी निष्काळजीपणामुळे उद्भवत असल्या तरी त्या चांगल्या नियोजन आणि प्रतिबंधात्मक पद्धतींनी टाळताही येतात. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्वतयारी केली आहे. एनडीआरएफ कंपन्या राज्यात प्रत्येक ठिकाणी आपत्तीमध्ये वेळेत पोहचू शकत नाहीत, यासाठी राज्यात सातही विभागांच्या ठिकाणी “राज्य आपत्ती प्रतिसाद दले” नेमण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ठाणे येथे महानगरपालिकेने आपत्ती प्रतिसादासाठी वेळेत धाऊन जाणारे दल तयार केले असून, त्यांनी विशेषत: इमारत दुर्घटनांमध्ये उत्तम काम केलेले आहे. ज्या ठिकाणी उंच इमारती आहेत तसेच आपत्तींची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी नगरपालिकांना आपली बचाव दले तयार करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधले आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे.
एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते, पण जीवितहानी झाल्याने झालेले नुकसान कितीही मदत निधी देऊन भरुन काढता येत नाही. या पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी प्रशासनासोबत जनतेनेही दक्ष राहणे गरजेचे आहे. शोध मोहिम-बचाव आणि सुटकेसाठी प्रशासनामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी करण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजीटल मॅपींग, प्रतिसाद, शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत, यापूर्वी झालेल्या भूस्खलन भागातील नागरिकांशी संवाद, पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घेणे कारण भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना चांगल्याप्रकारे माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत तयारी करण्याचे आदेश प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. बहुउद्देशीय सभागृहे, शाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत पूर्वतयारी करण्यात आली आहे. अशा ठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधोपचारसाठा याबाबत संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्या आहेत. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात आतापासूनच औषधांचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी तयारी ठेवण्यात आली आहे. वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरफशी संपर्क-समन्वय राखणे, हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क राहणे, जीवरक्षकांची आवश्यकता भासल्यास त्यांची मानधन तत्वावर नेमणूक करणे यासर्व गोष्टींसाठी संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर पूर्वतयारी करण्यात येत आहे. परंतू संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. विभागस्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात यावी त्यादृष्टीने जिल्हास्तरापासून ग्रामपातळीपर्यंत आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याशिवाय पूरपरिस्थीतीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दुरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दुरसंचार विभाग, रस्त्यांने वाहतूकीचा संपर्क असावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आपतकालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदीचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपतकालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरीरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे.
कोकण विभागात आपत्ती झाल्यास कृपया पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
विभागीय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष
कोंकण भवन, नवी मुंबई -022-27571516, उमेश शिर्के ,डीडीएमसी – 7588092320.
मुंबई शहर – 022-22664232, विशाल बडे, डीडीएमओ -9665304124.
मुंबई उपनगर – 022-69403344, दीपक शिंदे, डीडीएमओ -8104729077.
ठाणे -022-25301740, अनिता जवंजाळ, डीडीएमओ -7304613105.
पालघर -02525-299353, विवेकानंद कदम, डीडीएमओ -9322938937.
रायगड -02141-222118, सागर पाठक, डीडीएमओ -9763646326.
रत्नागिरी – 02352-226248, अजय सूर्यवंशी, डीडीएमओ -9420244937
सिंधुदुर्ग -02362-228847, राजेश्री सामंत, डीडीएमओ -9834385792.
प्रवि



