
ज्वारी खरेदी नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, प्रतिनिधी हमी दराने भरडधान्य ज्वारी खरेदीसाठी पुरेशी नोंदणी झालेली नाही. शासनाकडून भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी साठी दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांचे हमी दराने भरडधान्य ज्वारी नोंदणीसाठी यापुर्वी दि. २० जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतू मागील हंगामामधील ऑनलाईन शेतकरी नोंदणी आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मधील शेतकरी नोंदणी पाहता रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पुरेशी झाली नाही. त्यामुळे शासनाकडून भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करणेसाठी, आधारकार्ड, रब्बी २०२३-२४ चा सातबारा ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स, मोबाईल नंबर घेऊन कागदपत्रे स्कॅन करुन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येते. तसेच हाताने लिहिलेले सातबारा व खाडाखोड केलेले कागदपत्र कोणत्याही परिस्थितीत स्विकारण्यात येणार नाही. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावयाचे आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन सातबारावरील ज्वारी पिकपेऱ्यापेक्षा जास्त क्षेत्रावर नोंदणी करण्यात येणार नाही. तसे झाल्यास खरेदी केंद्राला जबाबदार ठरविण्यात येणार आहे. असे जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी कळविले आहे.
00000



