
आजपासून (दि.२७) ‘तरंग’ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा४० कंपन्या होणार सहभागी; विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- नाबार्ड, लघु शेतकरी कृषी संघ आणि खुले डिजीटल वाणिज्य संस्थान (ओएनडीसी) यांच्यावतीने शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार, प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंगः शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा’ शनिवार दि.२७ ते सोमवार दि.२९ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंक समन्वयक मंगेश केदार यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील चाळीस शेतकरी उत्पादक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. हा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील पाटीदार भवन, अमरप्रीत हॉटेल समोर, जालना रोड येथे शनिवार दि.२७ ते सोमवार दि.२९ होणार आहे. मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांमध्ये हा उपक्रम होणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे.
मेळाव्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, नाबार्डच्या मुख्य व्यवस्थापक रशी दराड, महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद घरड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, नाबार्डचे उप प्रबंधक अनिल रावत हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या समारोपास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जिल्हा अग्रणी बॅंक समन्वयक मंगेश केदार, सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय अमोल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीप झोड, तसेच निधी पंत, मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे संचालक प्रसाद कोकील, श्रीमती रुचा गणोरकर आदी मान्यवर तज्ज्ञ व्यक्ति विविध सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. यात कृषी उत्पादने, फळे, भाजीपाला, धान्ये, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि इतर विविध वस्तूंचा समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करावी असे, आवाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केले



