
लाचप्रकरणी दोघांना रंगेहाथ अटक पालिका अधिकाऱ्याचा शोध सुरू…
मुंबई, प्रतिनिधी
अंधेरी येथील महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयातील पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांच्या वतीने तब्बल ७५ लाख रुपये लाच घेणाऱ्या दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी अंधेरी, जे. बी. नगर येथील शहीद भगतसिंग वसाहतीत चार मजली इमारत बांधली होती. त्यातील वरचे दोन मजले अवैध आहेत. हे अवैध मजले पाडू नयेत, यासाठी तसेच फिर्यादी यांनी याच परिसरात विकत घेतलेल्या भूखंडांवर अवैध बांधकामास सहकार्य करण्यासाठी तारी यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने एसीबीकडे तक्रार दिली. त्याआधारे एसीबीने ६ ऑगस्टला तक्रारीची खातरजमा केली. तारी यांनी दोन कोटी रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट होताच बुधवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली.
७५ लाख रुपये घेताना…
मंदार तारी यांच्या वतीने मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासिन शहा (३३) आणि प्रतीक विजय पिसे (३५) हे दोघे तक्रारदाराकडून ७५ लाख रुपये घेताना रंगेहाथ सापडले. यातील शहा हा प्रॉपर्टी दलाल, तर पिसे कंत्राटदार असल्याची माहिती एसीबीने दिली. याप्रकरणी तारी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्याचा शोध सुरू आहे.



