vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

सोळा सोमवार व्रत माहिती

सोळा सोमवार व्रत माहिती

अध्यात्मिक वार्ता

व्रत वैकल्य हा हिंदू धर्माचा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा अनिवार्य असा भाग आहे. एखाद्या विशिष्ट काळासाठी अथवा आमरण आचरायचा एखादा नेमधर्म म्हणजे व्रत होय. वेदात सांगितल्या प्रमाणे व्रत म्हणजे आचरण होय.

 

“व्रियते स्वर्गं व्रतंती स्वर्ग मनेन वा” म्हणजे ज्या योगे स्वर्गाची प्राप्ती होते ते व्रत, अशी व्रताची व्याख्या होते. नित्य, नैमित्तिक व काम्य अशी व्रतांचे तीन प्रकार आहे. सोळा सोमवार हे काम्य व्रत आहे. व्रतामध्ये उपवास, पूजन, तपाचरण, जप व श्रद्धापूर्वक विधी इत्यादींचा समावेश होतो. बहुतेक सर्व व्रते यश, जय, विजय, विवाह, संतती, आरोग्य, धन, विद्या, कीर्ती, वैभव इत्यादींच्या प्राप्ती साठी म्हणजे सकाम असतात.,

 

“सोळा सोमवार” व्रत हे श्रीशंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे. श्रावण महिन्यात या व्रताला सुरवात करण्याचे विशेष महत्व असते.

हे व्रत करण्यासाठी स्त्री-पुरुष, वय, जात या कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत.

>> अविवाहीतांना मनोवांछित पती / पत्नी मिळण्यासाठी.

>> अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी.

>> उत्तम संततीप्राप्तीसाठी.

>> आरोग्यवर्धक /रोग/ व्याधींपासून मुक्तीसाठी.

>> आर्थिक अडचणी, संकटे तसेच विवंचना दूर करण्यासाठी.

>> ईच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्व सांगितले आहे.

 

व्रत कसे करावे.

सोळा सोमवार व्रताची सुरवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी. १६ सोमवार व्रत करून येणाऱ्या १७व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. किंवा कोणत्याही महिन्यातल्या शुभ सोमवारी व्रताचे उद्यापन करावे.

व्रत सुरु करताना सकाळी स्नान करून सोवळें किंवा धूत वस्त्र नेसून, महिलांनी व कुमारिका मुलींनी शक्यतो पांढरी साडी नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी. दिवसभर उपवास करावा. मनांत शंकराचे स्मरण करावे.

 

सोळा सोमवार व्रत पूजा: संध्याकाळी आंघोळ करावी. पाटावर पूजा मांडावी, धूप,दीप लावावा. पाटाभोवती रांगोळी काढून पाटावर तांदूळ टाकावे, त्यावर घरातील गणपती व महादेवाची पिंड ठेवावी. प्रथम गणेश पूजन करावे, नंतर पिंडीला उमामहेश्वराभ्यां नमः म्हणून पंचामृताचे स्नान घालावे अत्तर लावून, गंध अक्षत, भस्म, फुल, हार, बेल १०८ , वाहून मनोभावे शंकराच्या पिंडीची पूजा करावी. नैवेद्य अर्पण करावा. पूजेत बेलाची पाने अवश्य असावी. देवासमोर बसून “सोळा सोमवार कथा.” ( कहाणी ) वाचावी. “शिवस्तुती” म्हणून नंतर आरती करावी. दर सोमवारी जवळच्या शिव मंदिरात जाऊन एक भाग चूर्म्याचा प्रसाद देवाला अर्पण करावा, दुसरा भाग गाईला खाऊ घालावा व तिसरा भाग घरांतल्या मंडळीस वाटावा व आपण स्वत: घ्यावा.

 

सोळा सोमवार व्रताचा चूर्मा कसा करतात ?

गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे. हाताने कुसकरून चाळणीने चाळाव्या. यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे. याचे लाडू केले तरी हरकत नाही. चूर्मा करतांना कणिकेत मीठ घालू नये.

उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पांच शेर कणिकेचा (गव्हाच्या पिठाचा ) चूर्मा तयार करावा. त्याचेही वरील प्रमाणे तीन भाग करावे.

 

सोळा सोमवार व्रतस्थ व्यक्तीसाठी काही सूचना :

>> व्रतस्थ व्यक्तीने ब्रह्मचर्यत्वाचे काटेकोर पालन करावे.

>> मनाने, शरीराने तसेच विचारांनी शुद्ध असावे.

>>सूर्योदयापूर्वी उठून स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे.

>> प्रवासात असतांना जर शिवपूजन, सोळा सोमवार कथावाचन, प्रसाद अर्पण करता आला तर तो सोमवार संख्येत धरता येईल, अन्यथा संख्येत धरू नये. { उपवास मात्र करावा }

>> एकदम सोळा दाम्पत्य पूजन शक्य नसल्यास दर सोमवारी एका विवाहित दाम्पत्यस उमामहेश्वर स्वरूपी म्हणून जेवू घालावे. यथाशक्ती स्वरूपात दान करावे.

>> अनेक कुटुंबांमध्ये उद्यापनाच्या दिवशी १६ दाम्पत्य पूजन प्रघात आहे.

 

अडचणीच्या काळात चुकून उपवास मोडल्यास तो सोमवार सोडून द्यावा, संख्येत धरू नये. उपवास जर झेपत नसेल तर सोमवारी चहा, दुध व फळ, व उपवासाचे पदार्थ घेऊ शकता. कारण शरीराच रक्षण करुनच धर्म साधन शक्य आहे. शरीराला यातना देऊ नये.

 

सोळा सोमवार व्रताचे उद्यापन.

सोळा सोमवार व्रत उद्यापनाचे दोन प्रकार आहेत, एक प्रकार म्हणजे पुरोहिताकडून घरी विधियुक्त पद्धतीने उद्यापन आणि दुसरे म्हणजे मंदिरात जाऊन अभिषेकात्मक उद्यापन. मंदिरात पूजा शक्य नसल्यास पुरोहिताना घरी बोलावून रुद्र / लघुरुद्र अभिषेक करू शकता. दर्शनाला व प्रसाद वाटण्यासाठी जवळच्या शिव मंदिरात जावे लागेल.

कराच्या देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. १०८ किंवा १ हजार बिल्वपत्रे वहावी. नैवेद्य दाखवुन आरती करावी. मनांतल्यामनांत आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी.

चूर्म्याचे तीन भाग करून एक भाग मंदिरात देवाला, ब्राह्मणांना व मंदिरातील भक्तांना वाटावा दुसरा भाग गाईला चारावा आणि तिसरा भाग घरी आणून कुटंबातल्या सर्व मंडळींनी व स्वत: घ्यावा.

शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास, घरीच पुरोहिताना बोलावून श्रीशंकराची षोडशोपचार पूजा करावी. देवळात करावयाच्या म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी कराव्या.

उद्यापनाच्या दिवशी सुद्धा मागील १६ सोमवारांप्रमाणे “सोळा सोमवार कथा” वाचावी. “शिवस्तुती” म्हणून आरती करावी. चूर्म्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, आपण जेवतांना प्रसाद घ्यावा. कुटुंबातल्या सर्वांनी भोजन करावे.

मनोभावे व निष्ठापूर्वक व्रत करणाऱ्याच्या सर्व ईच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात.

संग्रह – वे.श्री.ईश्वर स्वामी होळीमठ ( ज्योतिष शास्त्री ) सोलापुर.

संबंधित पोस्ट

🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *शारदीय नवरात्रोत्सवाची* *माहुरगडावरुन* *आज तिसरी माळ* *दुर्वा, झेंडु*

vishwatmaklokswamivarta

श्री गणपती चे साडेतीन पीठाची: माहिती

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

              ‼️ *प्रवचन*‼️ *श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*   *३१ मे*

#अष्टविनायक_३*पालीचा श्री बल्लाळेश्र्वर🌺*

vishwatmaklokswamivarta

श्री रूद्राभिषेक महत्त्व- अध्यात्मिक वार्ता-